सिद्धिविनायक गणपती

गणपती अथर्वशीर्ष मराठी भावानुवाद

श्री गणपती अथर्वशीर्षाचा मराठी भावानुवाद

 

सिद्धिविनायक गणपती
सिद्धिविनायक गणपती

अथर्वशीर्ष – थर्व म्हणजे हलणारे / चल, आणि अथर्व म्हणजे ‘न हलणारे किंवा अचल, स्थिर’. शीर्षम् म्हणजे मस्तक (बुद्धी). सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे अथर्वशीर्ष म्हणजे – ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते असा मंत्रपाठ म्हणजे अथर्वशीर्ष !
(संस्कृत भाषेमध्ये अनुस्वाराचा उच्चार हा त्याच्या पुढच्या अक्षरावर अवलंबून असतो. अनुस्वाराच्या पुढचे अक्षर कोणते आहे, यावरून अनुस्वाराचा उच्चार ङ्, ञ्, ण्, न्, म् आदि होतो. अनुस्वाराचा योग्य उच्चार समजावा, यासाठी या स्तोत्रामध्ये अनुस्वाराऐवजी शक्य तेथे त्याच्या उच्चारासाठी येणारे अक्षर लिहिले आहे.)

॥ श्री गणेशाय नमः॥
॥ शान्तिमन्त्राः॥
ॐ भद्रङ् कर्णेभिः शृणुयाम देवा:। भद्रम् पश्येमाक्षभिर्यजत्राः॥
स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभि:। व्यशेम देवहितं यदायुः॥
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः। स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः॥
स्वस्तिनस्तार्क्ष्योऽअरिष्टनेमिः। स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु॥
ॐ सहनाववतु। सहनौ भुनक्तु। सहवीर्यङ् करवावहै।
तेजस्विनावधीतमस्तु। मा विद्विषावहै॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

शान्ति पाठ : हे देवा! भगवंताचे पूजन करताना आपण कल्याणकारक मंगलमय शब्द आपल्या कानाने ऐकावे, शुभ मंगलदायी गोष्टी आपल्या डोळ्यांनी पहाव्यात. निरोगी अवयवांसाहित, स्वस्थ देहाने, भगवंताचे स्तवन करत, देवाने आमच्या हितार्थ दिलेले दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, हीच प्रार्थना आहे.
ज्याची किर्ती वृद्धांपासून (परंपरेने) ऐकिवांत आहे, असा इंद्र आमचें कल्याण करो. सर्वज्ञ व सर्वसंपन्न असा पूषा (सूर्य) आमचे कल्याण करो. सर्व अरीष्टांचा नाश करण्यासाठी ज्याची शक्ती चक्रसदृश आहे, असा तार्क्ष्य (गरूड) – अरिष्टनेमी आमचे कल्याण करो. बुद्धीचा स्वामी, बृहस्पती आमचे कल्याण वृद्धिंगत करो.
(हे परमेश्वरा!) आम्हा दोघांचे (गुरु आणि शिष्य) रक्षण कर. आम्हा दोघांचे विद्येने भरण पोषण कर. आम्हा दोघांकडून (विद्याप्राप्तीचे, ज्ञानार्जनाचे) महान कार्य संपन्न होऊ दे. आमची बुद्धी, ज्ञान तेजस्वी होऊ दे, आमच्यात द्वेषभाव नसू दे.
आमच्या आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशा त्रिविध कष्टांची त्रासांची शांती होऊ दे.

 

॥ अथ अथर्वशीर्षारम्भः॥
ॐ नमस्ते गणपतये।
त्वमेव प्रत्यक्षन् तत्त्वमसि।
त्वमेव केवलङ् कर्ताऽसि।
त्वमेव केवलन् धर्ताऽसि।
त्वमेव केवलं हर्ताऽसि।
त्वमेव सर्वङ् खल्विदम् ब्रह्मासि।
त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ॥१॥

उपनिषद् : ॐकाररूपी गणपतीला नमन असो. तूच वेदातील तत्त्वज्ञान आहेस. तूच केवळ कर्ता आहेस. तूच केवळ (विश्वाचे) धारण करणारा (पोषण करणारा) आहेस. तूच केवळ (विश्वाचा) संहार करणारा आहेस. सर्व खल्निदं ब्रह्म या श्रुतीने प्रतीपादिलेले सकलव्यापक ब्रह्मही तूच आहेस. तूच प्रत्यक्ष दिसणारे ब्रह्मतत्व आहेस. तूच प्रत्यक्ष अविनाशी आत्मस्वरुप आहेस.

 

ऋतं वच्मि। सत्यं वच्मि ॥२॥

स्वरूप तत्व : मी यथार्थ व सत्य वचन बोलत आहे.

 

अव त्वम् माम्। अव वक्तारम्।
अव श्रोतारम्। अव दातारम्।
अव धातारम्। अवानूचानमव शिष्यम्।
अव पश्चात्तात्। अव पुरस्तात्।
अवोत्तरात्तात्। अव दक्षिणात्तात्।
अव चोर्ध्वात्तात्। अवाधरात्तात्।
सर्वतो माम् पाहि पाहि समन्तात् ॥३॥

(हे देवा!) तू माझे रक्षण कर. तुझा महिमा सांगणाऱ्यांचे तू रक्षण कर. तो (महिमा) श्रवण करणाऱ्यांचे तू रक्षण कर. तुझे ज्ञान देणाऱ्यांचे (दात्याचे) तू रक्षण कर. ते (ज्ञान) मिळवणाऱ्यांचे, घेणार्‍यांचे तू रक्षण कर. वेद पारंगत (ज्ञान देणार्‍या) गुरूंचे आणि त्यांच्या (ते ज्ञान धारण करणाऱ्या) शिष्यांचे रक्षण कर. माझे पाठीमागून (पश्चिमेकडून) रक्षण कर. माझे पुढून (पूर्वेकडून) रक्षण कर. माझे उत्तरेकडून रक्षण कर. माझे दक्षिणेकडून रक्षण कर. माझे उर्ध्व दिशेकडून (आकाशातून) रक्षण कर. माझे अधर दिशेकडून (पाताळातून) रक्षण कर. (हे देवा!) माझे सर्व दिशांकडून, आसमंताकडून रक्षण कर, सर्व ठिकाणी तू माझे रक्षण कर.

 

त्वं वाङ्मयस्त्वञ् चिन्मयः।
त्वम् आनन्दमयस्त्वम् ब्रह्ममयः।
त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि।
त्वम् प्रत्यक्षम् ब्रह्मासि।
त्वञ् ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ॥४॥

तू वेदादी वाड्.मयस्वरूप आहेस. तू चैतन्यस्वरूप आहेस. तू आनंदस्वरूप आहे. तू ब्रह्मस्वरूप आहेस. तू सत्, चित्, आनंद यापासून वेगळा नाहीस (सच्चिदानंद आहेस). तू साक्षात ब्रह्मस्वरूप आहेस. तू ज्ञानमय आणि विज्ञानमय आहेस.

 

सर्वञ् जगदिदन् त्वत्तो जायते।
सर्वञ् जगदिदन् त्वत्तस्तिष्ठति।
सर्वञ् जगदिदन् त्वयि लयमेष्यति।
सर्वञ् जगदिदन् त्वयि प्रत्येति।
त्वम् भूमिरापोऽनलोऽनिलो नभः।
त्वञ् चत्वारि वाक्पदानि ॥५॥

हे सर्व जग तुझ्यापासूनच निर्माण होते. हे सर्व जग तुझ्या आधारशक्तीनेच स्थिर टिकून रहाते. हे सर्व जग तुझ्यातच लय पावते, हे सर्व जग पुन्हा तुझ्यापासूनच उत्पन्न होते. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश ही पंचतत्त्वे तूच आहेस. तसेच (परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी या) चारही प्रकारच्या वाणी तूच आहेस.

 

त्वङ् गुणत्रयातीतः।
(त्वम् अवस्थात्रयातीतः।)
त्वन् देहत्रयातीतः।
त्वङ् कालत्रयातीतः।
त्वम् मूलाधारस्थितोऽसि नित्यम्।
त्वं शक्तित्रयात्मकः।
त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम्।
त्वम् ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम्
इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वञ्
चन्द्रमास्त्वम् ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् ॥६॥

तू (सत्त्व, रज आणि तम या) तीन गुणांपलीकडचा आहेस. तू (जागृत, स्वप्न आणि गाढ झोप या) तीन अवस्थांच्या पलीकडचा आहेस. तू (स्थूल, सूक्ष्म आणि कारणमय या) तीन देहांपलीकडचा आहेस. तू (भूत, वर्तमान आणि भविष्य या) तीनही काळांच्या पलीकडचा आहेस.
तू नेहमी (नाभिकमलातील) मूलाधार चक्रामध्ये असतोस. तू (इच्छा, क्रिया आणि ज्ञान या) तिन्ही शक्तींनी युक्त आहेस. तपस्वी तुझे नित्य चिंतन करतात.
तूच ब्रह्मा (सृष्टीकर्ता), तूच विष्णू (सृष्टीपालक), तूच रुद्र (शंकर – सृष्टी संहारक), तूच इंद्र (त्रिभुवन ऐश्वर्याचा उपभोग घेणारा), तूच अग्नी (यज्ञामध्ये हविर्द्रव्य ग्रहण करणारा), तूच वायू (सर्व जीवांना प्राण देणारा), तूच सूर्य (सर्वांना प्रकाश ऊर्जा देऊन कार्याची प्रेरणा देणारा), तूच चंद्र, तूच ब्रह्म (सर्व प्राणिमात्रांतील जीवरूप), तूच भूलोक (पृथ्वी), तूच भुवर्लोक (अंतरिक्ष), तूच स्वर्लोक (स्वर्ग), आणि ॐकार असे परब्रह्म आहेस.

 

गणादिम् पूर्वमुच्चार्य वर्णादिन् तदनन्तरम्।
अनुस्वारः परतरः। अर्धेन्दुलसितम्।
तारेण ऋद्धम्। एतत्तव मनुस्वरूपम्।
गकारः पूर्वरूपम्। अकारो मध्यमरूपम्।
अनुस्वारश्चान्त्यरूपम्। बिन्दुरुत्तररूपम्।
नादः सन्धानम्। संहिता सन्धिः।
सैषा गणेशविद्या। गणक ऋषिः।
निचृद्गायत्रीच्छन्दः। गणपतिर्देवता।
ॐ गँ गणपतये नमः ॥७॥

(गणेश मंत्र) गण शब्दातील आदि ‘ग्’ प्रथम उच्चारून, नंतर ‘अ’ चा उच्चार करावा. त्यानंतर अनुस्वाराचा उच्चार करावा. तो अर्ध चंद्राप्रमाणे असावा. तो तारक मंत्रानं ॐ कारानं युक्त असावा. हा संपूर्ण मंत्र ‘ॐ गँ’ असा होतो. हे तुझ्या मंत्राचं स्वरूप आहे.
‘ग्’ हे (मंत्राचे) पूर्व रूप आहे, ‘अ’ हा (मंत्राचा) मध्य आहे, अनुस्वार हा (मंत्राचा) कळस आहे. अर्धचंद्राकार बिंदू हे उत्तर रूप आहे. या गकारादी चारांपासून एक नाद तयार होतो. हा नादही एकरूप होतो. या नादप्रेरित वर्णांचा संधी-संमीलन संहितारूप एक प्रमाणे उच्चारण करणे असा असावा. अशा प्रकारे उच्चारलेला मंत्र म्हणजेच ती ही गणेशविद्या होय. या मंत्राचे ऋषी ‘गणक’ हे होय. ‘निचृद् गायत्री’ हा या मंत्राचा छंद होय. गणपती ही देवता आहे.
‘ॐ गँ गणपतये नमः’ ह्या मंत्ररूपानं दर्शविल्या जाणाऱ्या गणेशाला माझा नमस्कार असो.
(‘ॐ गँ’ हे ते मंत्रस्वरूप आहे. ते जपून झाल्यावर ‘गणपतये नम:’ असे म्हणून गणेशाला वंदन करावे.)
(या मंत्रस्वरूपामध्ये, ग् कार हा ब्रह्मदेवरूपी, अ कार हा विष्णूरूपी, अनुस्वार हा शिवरुपी, अनुनासिक हा सूर्यरूपी, आणि ओंकार हा शक्तीरूपी असल्यामुळे हा मंत्र म्हणजे देवता पंचायतनच आहे, असे म्हणतात.)

 

एकदन्ताय विद्महे। वक्रतुण्डाय धीमहि।
तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॥८॥

(गणेश गायत्री) आम्ही त्या एकदंताचे स्वरुप जाणतो, आणि वक्रतुण्डाचे चिंतन (ध्यान) करतो. म्हणून तो दंती (हस्तिदंत धरण केलेला – गणेश) आम्हाला (ज्ञान आणि ध्यान यात) स्फूर्ती देवो, प्रेरणा देवो (प्रगती साध्य होवो).

 

एकदन्तञ् चतुर्हस्तम्, पाशमङ्कुशधारिणम्।
रदञ् च वरदं हस्तैर्बिभ्राणम्, मूषकध्वजम्।
रक्तं लम्बोदरम्, शूर्पकर्णकम्, रक्तवाससम्।
रक्तगन्धानुलिप्ताङ्गम्, रक्तपुष्पैः सुपूजितम्।
भक्तानुकम्पिनन् देवञ्, जगत्कारणमच्युतम्।
आविर्भूतञ् च सृष्ट्यादौ, प्रकृतेः पुरुषात्परम्।
एवन् ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः ॥९॥

(गणेश रूप) (गणेशाला) एक दात आणि चार हात आहेत. एका हातात परशु आणि एका हातात अंकुश धारण केलेला आहे. एका हातात हत्तीचा दात आणि एका हाताने वर (आशीर्वाद) देत आहे. गणेशाचे उंदीर हे ध्वजचिन्ह आहे. त्याच्या शरीराचा रंग लाल असून पोट मोठे आहे, कान सुपासारखे आहेत, त्याने लाल रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत. रक्तचंदनाची उटी (लेप) सर्वांगाला लावलेला, अशा त्याचे लाल रंगाच्या फुलांनी पूजन केले जाते.
भक्तांविषयी पूर्ण दया असलेला, सृष्टीची उत्पत्ती करणारा, अविनाशी (अच्युत), असा हा देव सृष्टीच्या निर्मितीपूर्वीच प्रकट झालेला आहे आणि प्रकृतिपुरुषाहून श्रेष्ठ आहे. अशा गणेशाचे जो सतत ध्यान करतो, तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ होय.

 

नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रमथपतये,
नमस्ते अस्तु लम्बोदरायैकदन्ताय, विघ्ननाशिने
शिवसुताय, श्रीवरदमूर्तये नमः ॥१०॥

(अष्ट नाम गणपती) व्रातपतींना (समूह प्रमुखांना) नमस्कार असो. देवसमुदायांच्या अधिपतीला (गणपती) नमस्कार असो. शंकरगणसमुदायाच्या अधिपतीला (प्रमथपती) माझा नमस्कार असो. लंबोदर, एकदंत, विघ्नहर्ता, शिवपुत्र, आणि वर देणाऱ्या अशा वरदमूर्तीस माझा नमस्कार असो.

 

॥ फल श्रुति॥
ॐ एतदथर्वशीर्षं योऽधीते। स ब्रह्मभूयाय कल्पते।
स सर्वविघ्नैर्न बाध्यते। स सर्वतः सुखमेधते।
स पञ्चमहापापात् प्रमुच्यते।
सायमधीयानो दिवसकृतम् पापन् नाशयति।
प्रातरधीयानो रात्रिकृतम् पापन् नाशयति।
सायम् प्रातः प्रयुञ्जानोऽअपापो भवति।
सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति।
धर्मार्थकाममोक्षञ् च विन्दति।
इदम् अथर्वशीर्षम् अशिष्याय न देयम्।
यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति।
सहस्रावर्तनात् यं यङ् काममधीते।
तन् तमनेन साधयेत् ॥११॥

(फल श्रुति) या अथर्वशीर्षाचे अध्ययन करणारा ब्रह्मस्वरूप होतो. त्याला सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात. त्याला सर्व विघ्न बाधा होत नाही (सर्व विघ्नांच्या बाधेपासून मुक्ती मिळते). त्याला सर्व प्रकारची सुखे उपभोगायला मिळतात. तो पाच महापातकांपासून (ब्रह्महत्या, अभक्ष्यभक्षण, परस्त्रीगमन, सुवर्णचौर्य, आणि हे पापकृत्य करणार्‍यांशी संगत) मुक्त होतो.
सायंकाळी अध्ययन केल्याने दिवसभर केलेल्या (नकळत झालेल्या) पापांचा नाश होतो. प्रात: समयी पठण केल्याने रात्री केलेल्या (नकळत झालेल्या) पापांचा नाश होतो. सकाळ संध्याकाळ पठण करणारा पापरहित होतो. सतत (सर्व परिस्थितींमध्ये, सर्वत्र) पठण करणारा निर्विघ्न होतो. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ त्याला प्राप्त होतात.
हे अथर्वशीर्ष (श्रद्धा नसलेल्या) अयोग्य शिष्यास शिकवू नये. जो कोणी मोहाच्या आहारी जाऊन, हे स्तोत्र (अयोग्य अशा अशिष्यास) शिकवतो त्याला पाप लागते. (या स्तोत्राची) सहस्त्र आवर्तने करून, मनोवांछित फलकामना प्राप्त होते.

 

अनेन गणपतिमभिषिञ्चति।
स वाग्मी भवति।
चतुर्थ्यामनश्नन् जपति।
स विद्यावान् भवति।
इत्यथर्वणवाक्यम्।
ब्रह्माद्यावरणं विद्यात्।
न बिभेति कदाचनेति ॥१२॥

ह्या अथर्वशीर्षाने गणपतीला जो अभिषेक करतो तो उत्तम वक्ता (वाग्मी) होतो. चतुर्थीला उपोषण करून जप करणारा विद्यासंपन्न होतो. हे अथर्वण ऋषींचे वचन आहे. ह्या विद्येने ब्रह्मप्राप्तीसाठी तपश्चर्या करणाऱ्यास कोणतेही भय कधीही राहणार नाही.

 

यो दूर्वाङ्कुरैर्यजति। स वैश्रवणोपमो भवति।
यो लाजैर्यजति, स यशोवान् भवति।
स मेधावान् भवति।
यो मोदकसहस्रेण यजति।
स वाञ्छितफलमवाप्नोति।
यः साज्यसमिद्भिर्यजति।
स सर्वं लभते, स सर्वं लभते ॥१३॥

जो दुर्वांकुरांनी हवन करतो, तो कुबेराप्रमाणे धनवान होतो. जो साळीच्या (भाताच्या) लाहयांनी हवन करतो, तो यशस्वी होतो, तो बुद्धिमान होतो. जो सहस्र मोदकांनी हवन करतो, तो मनोवांछित फलप्राप्ती साध्य करतो. जो घृतयुक्त समिधांनी हवन करतो, तो सर्व काही प्राप्त करतो.

 

अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा,
सूर्यवर्चस्वी भवति।
सूर्यग्रहे महानद्याम् प्रतिमासन्निधौ वा जप्त्वा,
सिद्धमन्त्रो भवति।
महाविघ्नात् प्रमुच्यते।
महादोषात् प्रमुच्यते।
महापापात् प्रमुच्यते।
स सर्वविद् भवति, स सर्वविद् भवति।
य एवं वेद ॥१४॥
इत्युपनिषत्।

आठ ब्राम्हणांना या अथर्वशीर्षाचा योग्य प्रकारें उपदेश केल्यास (शिकविल्यास), उपदेश करणारा (शिकवणारा) सूर्यासारखा तेजस्वी होतो. सूर्यग्रहणांत, महानदीतीरीं किंवा गणपती प्रतिमेसमीप जप (अनुष्ठान) केल्यास, हा मंत्रजप करणारा साधक सिद्धमंत्र होतो. (मंत्रात सांगितलेल्या फळाची तत्काळ प्राप्ती होण्याचे सामर्थ्य ज्याला लाभले आहे असा साधक म्हणजे सिद्धमंत्र). (असा हा मंत्र सिद्धमंत्र साधक) महाविघ्नांपासून मुक्त होतो, महादोषांपासून मुक्त होतो, महापापांपासून मुक्त होतो. हे जो यथार्थ जाणतो, तो सर्वज्ञ होतो. तो सर्वज्ञानी होतो. अशा प्रकारची ही ब्रह्मविद्या आहे.
हे उपनिषद समाप्त झाले.

 

(शान्तिमन्त्राः)
ॐ भद्रङ् कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रम् पश्येमाक्षभिर्यजत्राः।
स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः॥
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः।
स्वस्ति नस्तार्क्ष्योऽअरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु॥
ॐ सहनाववतु। सह नौ भुनक्तु। सहवीर्यङ् करवावहै।
तेजस्विनावधीतमस्तु। मा विद्विषावहै॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

(शान्ति पाठ) हे देवा! भगवंताचे पूजन करताना आपण कल्याणकारक मंगलमय शब्द आपल्या कानाने ऐकावे, शुभ मंगलदायी गोष्टी आपल्या डोळ्यांनी पहाव्यात. निरोगी अवयवांसाहित, स्वस्थ देहाने, भगवंताचे स्तवन करत, देवाने आमच्या हितार्थ दिलेले दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, हीच प्रार्थना आहे.
ज्याची किर्ती वृद्धांपासून (परंपरेने) ऐकिवांत आहे, असा इंद्र आमचें कल्याण करो. सर्वज्ञ व सर्वसंपन्न असा पूषा (सूर्य) आमचे कल्याण करो. सर्व अरीष्टांचा नाश करण्यासाठी ज्याची शक्ती चक्र सदृश आहे, असा तार्क्ष्य (गरूड) – अरिष्टनेमी आमचे कल्याण करो. बुद्धीचा स्वामी, बृहस्पती आमचे कल्याण वृद्धिंगत करो.
(हे परमेश्वरा!) आम्हा दोघांचे (गुरु आणि शिष्य) रक्षण कर. आम्हा दोघांचे विद्येने भरण पोषण कर. आम्हा दोघांकडून (विद्याप्राप्तीचे, ज्ञानार्जनाचे) महान कार्य संपन्न होऊ दे. आमची बुद्धी, ज्ञान तेजस्वी होऊ दे, आमच्यात द्वेषभाव नसू दे.
आमच्या आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशा त्रिविध कष्टांची त्रासांची शांती होऊ दे.

🙏🌹🙏

लेखन, संकलन – श्रीरंग विभांडिक