भगवान श्रीराम : आदर्श संस्कार आणि सदाचार
आदिकवि महर्षि वाल्मिकींनी देवर्षि नारदांना विचारले की, हे प्रभो, गुणवान, वीर्यवान, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवादी आणि दृढव्रती व सदाचारी असा कोण पुरुष या त्रेतायुगात सर्व जीवांचा हितकारक असेल ? त्यावर महर्षि नारदांनी सांगितले की, इक्ष्वाकु कुळात जन्माला आलेला मनाला जिंकलेला, महाबलवान, कान्तिमान, धैर्यवान, बुद्धिमान, नीतिज्ञ व शत्रुसंहारक आणि जितेंद्रिय असा भगवान श्रीराम हाच तो पुरुष आहे. नारदमुनी पुढे म्हणतात की, पुष्ट, सुडौल, धर्मज्ञ, वेदवेदाङ्गतत्त्वज्ञ आणि सर्वलोकप्रिय असा हा श्रीराम आहे. समुद्राला सर्व नद्या येऊन मिळतात तसे सर्व सद्गुण आणि साधु अशा या श्रीरामाला येऊन मिळतात. अशा शब्दांत वाल्मिकी महर्षिंच्या व्यथेचे निरसन नारदांनी केले. गंभीरतेत समुद्राच्या आणि धैर्यामध्ये हिमालयाच्या उत्तुंगतेचे श्रीरामांचे चरीत्र आहे. श्रीराम व्यक्ति नाही तर समष्टिच आहे.