सर्वाग्रपूज्य श्रीगणेश

सर्वाग्रपूज्य श्रीगणेश

        “एकमेवाद्वितीयम्” म्हणजे सर्व चराचर सृष्टीत ईश्वरसत्ता म्हणजे ब्रहासत्ता हीच एकमेव  परमसत्ता आहे. उपनिषदांनुसार अव्यक्त अशा परब्रह्माचे व्यक्त रूप म्हणजे शब्दब्रह्म होय. अव्यक्त परब्रह्मातून सर्वप्रथम व्यक्त रूपात शब्दब्रह्म साकारले. शब्दब्रह्म हे आकाशतत्वाचे प्रतीक आहे. आकाशतत्वाचे विशुद्ध स्वरूप ॐ (ओंकार). आकाशतत्वानंतर इतर पंचमहाभूते व तदनंतर चराचर सृष्टी निर्माण झाली. ॐ हे सृष्टीचे आदी घटकद्रव्य आहे. तात्पर्य ॐकारच सर्व विश्वाचे मूळकारण आहे. श्री संत तुकाराम महाराजही ॐकारास ‘कल्पबीज’ म्हणजे विश्वाचे मूळ कारण म्हणतात. श्री गणपती ही देवता ॐकाराचे व्यक्त रूप असून शब्दब्रह्माची देवता आहे. प्रत्यक्ष ॐकाराचेच प्रतीक आहे. आणि अशा प्रकारे सर्व चराचराचे अधिकारण व अव्यक्त परबह्याचे सर्वप्रथम व्यक्त रूप म्हणून श्री गणेश देवता “सर्वाग्रपूज्य” ठरते. सर्व ठिकाणी, सर्व कार्यात, सर्व लोकात, सर्व वेळी व सर्व देवादिकांत म्हणूनच श्री गणेशाला अग्रक्रमाने पूजले जाते.

        सर्व चराचर सृष्टी ही पंचमहाभूतात्मक असून त्या त्या संबंधी पंचदेवांची उपासना आलीच पाहीजे या तत्वावर आधारीत पंचदेवोपासनेत श्री गणेश हे जलतत्वाचे प्रतीक किंवा जलतत्वाची देवता मानले आहे. जीवांच्या अस्तित्वाचे आद्य कारण जल होय आणि म्हणून जलतत्वाच्या देवतेची श्री गणेशाची सर्व प्रथम पूजा करावी असा पंचदेवोपासनेत संकेत मिळतो.

        “यथा पिण्डे तथा ब्रह्माण्डें” म्हणजे ज्या मूळ तत्वांनी आपले हे शरीर बनलेले आहे व त्यात आध्यात्मिक शक्तींची निर्मिती झालेली आहे, त्याच मूळ तत्वांनी हे अखिल विश्व बनलेले आहे. “सर्व खल्विदं ब्रह्म” म्हणजे हे सर्व जे काही आहे ते ब्रह्मच आहे आणि अशा ह्या ब्रह्ममय विश्वाचीच एक छोटी प्रतिकृती म्हणजे मनुष्य होय. हे सर्व चराचरच ब्रह्ममय आहे. या अशा ब्रह्माशी तादात्म्य पावल्याने, एकरूप झाल्यानेच श्रीसंत ज्ञानराजमाऊलीला रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेता आले आणि वेद म्हणजे शब्दरूप ब्रह्माच. अव्यक्त परब्रह्याचे आकाशतत्वानुगामी व्यक्त स्वरूप म्हणजे सर्व वेदांचे मूळ बीज ॐ आणि म्हणूनच ज्ञानेश्वरीत ज्ञानराज माऊलींनी ॐकाराचे व त्याच्या अधिष्ठात्री देवता गणपतीचे सर्वांगसुंदर तात्विक व लालित्यपूर्ण वर्णन केलेले आहे.

        गणेश : गण अधिक ईश. गण म्हणजे समुदाय. पंच ज्ञानेंद्रिये अअणि पंच कर्मेंद्रिये अशा दश इंद्रियांच्या समुदायाचा स्वामी तो गणेश होय. म्हणूनही श्री गणेशाच्या पूजेला सर्वप्रथम मान मिळतो. हिंदू संस्कृतीत प्राचीन परंपरेनुसार मुलाच्या सर्वप्रथम शिक्षणाची सुरूवातच मुळी “श्रीगणेशाय नम:” या श्री गणेशाच्या वंदन स्वरूप पदाने होते. सर्व प्रकारचे लेखनादि कार्य ‘श्री’ने आरंभ होते. ते आपण शुभसूचक मंगल मानतो. नुसता श्री हे श्रीगणेशाचे प्रतीक मानतात.

मनुष्याच्या प्रत्येक प्रयत्नास ज्ञात-अज्ञात, लौकीक-अलौकीक, दृष्य-अदृष्य अनेक प्रकारच्या र्मयादा असतात. कार्याच्या सुरूवातीलाच या सर्वाचे आकलन करून घेणे वा होणे ही माणसाच्या शक्तीबाहेरची गोष्ट असते. माणसाचे ज्ञान अत्यंत क्षणभंगुर व तोकडे असते. स्वतःपासून एका पावलाच्या अंतरावर काय आहे व पुढच्या क्षणी काय होईल याचा वेध घेण्याची माणसाच्या बुद्धिची कुवत मूळीच नाही. असे असूनही माणसाचा अहंकार मात्र अती प्रबळ व सर्वतोपरी होतो ती अवस्था म्हणजे बुद्धिनाश आणि “बुद्धिनाशात प्रणश्यति”.

श्री गणेश ही सर्व गुणांची खाण, सकल विद्यांची अधिष्ठात्री देवता, सर्वानंदाचे निजधाम आणि सकल ज्ञानभांडार आहे. सर्व विघ्नांचा नाश करणारे व सर्व सुखांचा कर्ता आहे. सर्व गणांचा अधिपति, देवांना वंदनीय व पूजनीय आहे. सर्व सामर्थ्यशाली देवही ज्याचे पूजन करून स्व-इच्छित कार्यास त्याचे आशीर्वाद मागतात त्या श्री गणेशाला आपण मानवांनी अत्यंत नम्रभावाने, अहंकाररहीत मनाने, शरणागत वृत्तीने सर्वप्रथम वंदन केलेच पाहीजे.

(लेख पूर्वप्रसिद्धी – दै. आपला महाराष्ट्र, दि. ०२/०९/१९९०, पान नं. ४ वर प्रकाशीत.)

— लेखन, संकलन, संपादन – सोमनाथशास्त्री विभांडिक, ठाणे.
                                                  संपर्क – ९४२३९ ६४६७३

 

आपण आपली प्रतिक्रिया/अभिप्राय येथे नोंदवू शकता.

error: Content is protected !! Contact - shree.dnyanopasana@gmail.com
Scroll to Top