श्री कानबाई माता (कानुमाता) उत्सव

श्री कानबाई माता (कानुमाता) उत्सव

श्री कानबाईमाता (कानुमाता) उत्सव

        खान्देशच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात श्री कानुमातेच्या उत्सवास मोठे मानाचे स्थान आणि प्रतिष्ठा आहे. श्री कानुमातेचा उत्सव दर वर्षी श्रावण महिन्यात शुद्ध पक्षात साजरा केला जातो. नागपंचमी नंतर येणार्‍या पहिल्या रविवारी श्री कानबाई मातेचा उत्सव केला जातो. नागपंचमी नंतरचा रविवार हाच दिवस निश्चित असल्याने पूजेसाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं, हा खान्देश = कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी ‘कानबाई’ हे नाव घेतलं असावं. असो. हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी, पाटील, इ. समाजात आणि प्रामुख्याने खान्देशात साजरा होतो.

        परंपरेने चालत आलेल्या व कायमस्वरूपी जतन केलेल्या श्रीफळ रूपातल्या श्री कानबाई (कानुमाता) आणि श्री रानबाई (राणुमाता) अशा जोडीने या देवीची पूजा-अर्चना केली जाते. काही कुटुंबांमध्ये हातापायाची कानबाई असते तर काहींकडे कानबाई-रानबाई अशा दोन्ही देवी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात. काहींकडे देवीच्या चौरंगावर छोटा मांडव घालतात. परंतु या सर्व पद्धतीत देवीचे हे परंपरागत श्रीफळ/नारळ हा या उत्सवाचा महत्वाचा गाभा आहे. या श्रीफळांचा वर्षोनुवर्षे अतिशय काळजीपूर्वक सांभाळ केला जातो. हे श्रीफळ कालांतराने जीर्ण झाल्यास, हाताळणे कठीण झाल्यास त्यास नवरूप द्यावे/नूतनीकरण करावे (परणून आणणे असे या विधीचे नाव आहे, सविस्तर माहिती पुढील लेखात).

        या उत्सवाच्या आधीही दिवाळीसणाच्या आधी करतात तशी घराची स्वच्छता, रंगरंगोटी, सजावट करतात. घरातील सर्व भांडी घासून पुसून स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, इ. सगळे स्वच्छ धुवून घेतात. देवघरातील सर्व देव घासून पुसून लख्ख स्वच्छ चकचकीत करतात, हार – फुले यांची सजावट करतात. एकूणच, सर्व घर, वातावरण  देवीच्या आगमनासाठी स्वच्छ पवित्र सुसज्ज करतात.

रोट

        कानबाईच्या उपासनेत ‘रोट’ या विधीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कानबाईचे रोट हा एक महत्त्वपूर्ण कुळाचार आहे. रोट म्हणजे देवीच्या पूजेसाठी घरातील सर्व भाऊबंदांच्या नावाने मोजून घेतले जाणारे गहू, आणि त्याचा प्रसाद. हा रोटांचा प्रसाद केवळ सुतकी भाऊबंदांनी ग्रहण करावा. यावेळी घरात उपस्थित असलेल्या लग्न झालेल्या मुली व इतर नातलग/मित्र-मंडळी यांना हा प्रसाद ग्रहण करता येत नाही (दुसर्‍या कुळातील असल्याने), त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वयंपाक करतात.

        रोट हे कुठल्याही परिस्थितीत श्रावण पौर्णिमेच्या आधी संपवायचे असतात. तसेच रोट संपण्यापूर्वी, ‘रोटाचा वाढवा’ म्हणून एक छोटा विधी करून मगच संपवले जातात. ‘रोटाचा वाढवा’ म्हणजे रोट थोडे शिल्लक असताना तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवून मग रोट संपवावे. रोटाचा वाढवा तिसर्‍या दिवशी (म्हणजेच लगेचच्या बुधवारी – कानबाई बसवण्याचा रविवार हा पहिला दिवस पकडून) करता येत नाही. रोट तिसर्‍या दिवशी संपत आहेत असे लक्षात आल्यास, रोट जाणीवपूर्वक उरवून/शिल्लक ठेवून मग चौथ्या दिवशी संपवावेत. रोट बाहेरगावी नेता येत नाही. रोट गायीला खाऊ घालता येत नाही. रोट केवळ सुतकी भाऊबंदांनीच खायचे असतात. घरी येणार्‍या पाहुण्यांसाठी, विवाहित मुलींसाठी, वेगळा स्वयंपाक करतात, त्यांना रोटाचे पदार्थ देत नाहीत.

        रोट संपेपर्यंत जेवून हात धुतलेलं पाणी, उष्ट्या खरकट्या ताटातील पाणी सुद्धा सांभाळून विसर्जित करतात. एखाद्या झाडाजवळ / कोपर्‍यामध्ये, कोणाच्या पायदळी येणार नाही अशा बेताने एक मोठा खड्डा करुन त्यात हे सर्व पाणी ओततात, त्यास ‘समुद्र’ असे म्हणतात. काहीही उष्टे, खरकटे गटारीत / मोरीत / बेसिन मध्ये किंवा इकडे तिकडे पडू देत नाहीत. आपले उष्टे/खरकटे तुळशीला विसर्जित करू नये. रोट संपेपर्यंत हा नियम काळजीपूर्वक  पाळावा.

        काही कुटुंबांमध्ये देवीचे नारळ आणि त्यांची पूजा असा प्रकार नसतो, केवळ रोटांची पूजा असते. अशी मंडळी सामान्यप्रमाणेच रोट बनवून, जवळपास ज्या घरी कानबाईची पूजा असेल तिथे जावून देवीसमोर ते रोट पूजतात, रोटांचा नैवेद्य दाखवतात. बाकी रोटांचे नियम सारखेच असतात.

रोट मोजण्याची पद्धत –

 • कानबाईमाता पूजेच्या रविवारी सकाळी, घरातील कर्त्या सुवासिनीने शुचिर्भूत होऊन देवपूजा करावी. कुलदेवतेची पूजा करावी.
 • कुटुंबात वंश परंपरेने चालत आलेल्या मापाप्रमाणे गहू मोजून घ्यावे. हे माप सव्वा या प्रमाणात असते (सव्वा शेर, सव्वा पाव, इ). (आपल्या विभांडिक कुटुंबात सव्वा पाव मापाचा रोट असतो).
 • त्यानंतर देव, कानबाई, रानबाई, गाय-वासरू, गुरव यांच्या नावाने प्रत्येकी पाच मुठी गहू मोजून घ्यावे.
 • कुटुंबात रोटांची ज्याप्रमाणे वाटणी झाली असेल त्या प्रमाणे कुटुंबातील सर्व लहान मोठ्या जीवित पुरुषांच्या नावाने प्रत्येकी पाच मुठी गहू मोजून घ्यावे.
 • सर्वांच्या नावाने प्रत्येकी ५ मुठी गहू मोजून झाल्यावर, चुकीने एखादे नाव सुटल्याची शक्यता गृहीत धरून आणखी ५ मुठी गहू घ्यावेत.
 • मोजलेल्या गव्हामध्ये आंब्याच्या पानावर देवीचे टाक ठेवून पूजा करावी. गणपतीची, देवीची आरती करावी. नैवेद्य दाखवावा.
 • हे मोजलेले गहू चक्कीवरुन दळून आणावे.
 • हे गहू आणि त्याच्या पोळ्या / पुरणपोळया यांनाच पूर्ण पूजा संपेपर्यंत रोट असे म्हणतात.
 • रोटाचे गहू दळून आणल्यानंतर सर्व उपस्थित भाऊ-बंदांना पुरेशा होतील या प्रमाणात रोटाच्या पुरणपोळया कराव्यात.
 • या पुरणपोळ्यांची एक चळत नैवेद्य आणि पूजेसाठी बनवून ठेवावी.

पूजाविधी

साधारणत: सूर्यास्ताच्या थोडा वेळ आधी पूजा मांडण्यास सुरवात करावी. स्वच्छ धुतलेला चौरंग घ्यावा. त्यावर स्वच्छ खण अंथरावा. चौरंगाला केळीचे खांब बांधावे. कण्हेरीच्या डहाळ्या (छोट्या नाजूकशा पांनांसहित फांद्या) लावाव्यात. हार फुले समई धूप दीप इ. यांची सजावट करावी. सनई/इतर मंगलवाद्ये लावून वातावरण मंगलमय करावे. प्रवेशद्वारी सडा-रांगोळी, आंब्याचे तोरण, आंब्याच्या डहाळ्या, कण्हेरीच्या डहाळ्या, रोषणाई/लाईटिंग, पताका इ. यथाशक्ती करावे. वातावरण आनंदी, उल्हसित, मंगलमय करावे.

 • सर्वप्रथम पूजा मांडणी करणार्‍या व्यक्तीने शुचिर्भूत होऊन (व जमल्यास सोवळे नेसून) देवाला नमस्कार करावा, घरातील वडीलधार्‍यांना नमस्कार करावा आणि मग देवीची पूजा मांडण्यास सुरवात करावी.
 • चौरंगावर पूजा करणार्‍याच्या उजव्या बाजूस थोडे तांदूळ ठेवावे, त्यावर कलश ठेवावा. कलशात स्वच्छ पाणी भरून, रुपया सुपारी टाकावी. कलशावर ५ विड्याची पाने मांडावीत. कलशाला लाल गंधाची पाच बोटे लावावीत.
 • परंपरागत कानबाईच्या नारळाला प्रथम शुद्धोदक, मग पंचामृत, परत शुद्धोदक याप्रकारे स्नान घालावे.
 • नारळाला हळद कुंकवाचा टिळा लावून खण, मंगळसूत्र, नथ, डोळे, कानातले, शेवंतीची वेणी, इ साज-शृंगार करून कलशावर कानबाईरूपी नारळाची स्थापना करावी.
 • कानबाईच्या उजव्या बाजूला म्हणजेच पूजा करणार्‍याच्या डाव्या बाजूला श्री रानबाई मातेची स्थापना वरील प्रमाणेच करावी.
 • रानबाई मातेची स्थापना कलशावर करत नाही. त्याऐवजी थोडे तांदूळ चौरंगावर ठेवून त्यावर रानबाईमातारूपी नारळाची स्थापना करावी. हळद कुंकवाचा टिळा लावून खणाचे वस्त्र, मंगळसूत्र, नथ, डोळे, कानातले, शेवंतीची वेणी, इ साज-शृंगार करावा.
 • दोन्ही देवींच्या समोरील जागेत, चौरंगाच्या मध्यभागी विडयाची पाने ठेवावीत. त्यावर एका बाजूला (देवीचे टाक मध्यभागी ठेवता येतील अशा बेताने), रुपया आणि त्यावर सुपारी अशा स्वरुपात गणेशाची स्थापना करावी. देवीचे टाक ठेवण्यासाठी जागा मोकळी सोडावी.
 • देवीचे टाक ताम्हणात घेऊन त्यांना प्रथम शुद्धोदक, मग पंचामृत, परत शुद्धोदक याप्रकारे स्नान घालावे.
 • देवीचे टाक पुसून विड्याच्या पानांवर ठेवावेत. हळद कुंकू अक्षता फुले धूप दीप यांनी पूजा करावी.
 • देवीजवळ खोबर्‍याच्या वाटीत गुळाचा खडा ठेवून त्याचा नैवेद्य दाखवावा.
 • देवीजवळ काकडी, केळी, लिंबू हे देवीचे आवडते पदार्थ ठेवावेत.
 • काही ठिकाणी हौस म्हणून देवीला बाजारातील तयार मुखवटयांची सजावट केली जाते. (आपल्या विभांडिक कुटुंबात या प्रकारची कोणतीही पूर्वापार प्रथा नाही, त्यामुळे अशा प्रकारची मुखवटयांची सजावट करून नवीन प्रथा निर्माण करू नयेत).
 • काही ठिकाणी देवीला खोबर्‍याच्या वाट्यांची माळ करायची पद्धत आहे. (आपल्या विभांडिक कुटुंबात या प्रकारची कोणतीही पूर्वापार प्रथा नाही, त्यामुळे अशा प्रकारची माळ लावून नवीन प्रथा निर्माण करू नयेत).

 • वरीलप्रमाणे सर्व पूजा मांडणी झाल्यावर श्री दुर्गा सप्तशती ग्रंथातील देवीची पुढील स्तोत्रे, पाठ, इ. यथाशक्ती पठण करावे.
      • श्रीदेव्यथर्वशीर्षम्
      • अथ देव्या: कवचम्
      • अथार्गलास्तोत्रम्
      • देवीसूक्तम्
      • सिद्धकुञ्जिकास्तोत्रम्

श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ घरात उपलब्ध नसल्यास पुढे दिलेल्या लिंकवरून डाऊनलोड करून घेऊ शकतात – श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ डाऊनलोड

 • रोटांच्या नैवेद्याचे ताट देवीपुढे मांडून ठेवावे. ताटातील दिवे प्रज्वलित करावेत. (नैवेद्याच्या ताटाच्या मांडणीची माहिती पुढे दिली आहे).
 • यानंतर गणपतीची आणि देवीची आरती करावी. कर्पूरारती, मंत्रपुष्पांजली करावी.
 • रोटांचा नैवेद्य दाखवावा. देवीचे आवडते पदार्थ – ज्वारीच्या लाहया, फुटाणे आणि काकडी यांचाही नैवेद्य दाखवावा. देवीस श्रीफळ वाढवावे.
 • सर्व उपस्थितांनी देवीची मनोभावे पूजा करावी.
 • देवीसमोर फुगड्या, देवीची गाणी, स्तोत्र पठण, मंत्र जप, इ करून आनंदोत्सव साजरा करावा.
 • दर्शनासाठी आलेल्या सर्वांना ज्वारीच्या लाहया, फुटाणे आणि काकडीचा प्रसाद द्यावा.

रोटांचा नैवेद्य

देवीची यथासांग पूजा, आरती झाल्यावर देवीला रोटांचा नैवेद्य दाखवला जातो.

 • नैवेद्य दाखवण्यासाठी रोटांच्या पुरणपोळयांची चळत एका मोठ्या ताटात (काशाचे ताट असल्यास उत्तम) मध्यभागी ठेवतात.
 • त्यावर कणकेचे मोठे दिवे पुढील बाजूस ठेवून त्यात फुलवाती लावतात. तसेच खोबर्‍याच्या पसरट वाट्यांमध्ये फुलवाती ठेवून त्यांचेही दिवे बनवतात व कणकेच्या दिव्यांमागे ते ठेवतात. दिवे प्रज्वलनासाठी शुद्ध तूप वापरावे, तेल/डालडा वापरू नये.
 • देवीच्या नैवेद्यासाठी भात, कटाची आमटी, गंगाफळाची (लाल भोपळा) भाजी, हरभर्‍याच्या डाळीचे फुनके (याला या पूजेच्या दिवशी नारळ असे म्हणतात), तांदळाची खीर, तळण (भजी, पापड, कुरडाइ, इ) करतात.
 • लहान वाट्यांमध्ये केलेल्या स्वयंपाकातील प्रत्येक पदार्थ ठेवतात. सोबत तुपाची वाटी ठेवतात.
 • एकूण सर्व मांडणी खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे असते.

 • पूजा झाल्यावर जेवणाचे वेळी नैवेद्याच्या ताटातील भात, आमटी, भाजी, तळण, फुनके (नारळ), इ सर्व पदार्थ वाढून घ्यावेत. नैवेद्याच्या ताटात काही रोट शिल्लक ठेवून बाकी रोट भाऊ-बंदांमध्ये वाढून द्यावे. जेवून झाल्यावर हात धुतलेले पाणी, खरकटे पाणी एका खड्ड्यात (समुद्र) विसर्जित करावे.
 • घरातील सर्वांची जेवणे होईपर्यंत कणकेचे दिवे आणि खोबर्‍याच्या वाटीचे दिवे प्रज्वलित राहतील याची काळजी घ्यावी. त्यासाठी दिव्यांमध्ये योग्य प्रमाणात तूप वापरावे. (बर्‍याचदा खोबर्‍याच्या वाट्या दिव्याच्या उष्णतेमुळे जळतात, पेट घेतात, त्यावेळी जाळलेल्या भागावर पुरणाचा गोळा ठेवून वाटीला लागणारी आच कमी करता येते.)
 • रोटांवरील चारही दिवे शांत झाल्यावर नैवेद्याच्या ताटात शिल्लक ठेवेलेले रोट आणि दिवे देवीजवळच व्यवस्थित झाकून ठेवावेत.
 • दुसर्‍या दिवशी घरातील कर्त्या सुवासिनीने शुचिर्भूत होऊन देवपूजा आटोपून झाकून ठेवलेले रोट आणि कणकेचे दिवे यांचा चुरमा करावा. हा चुरमा घरातील भाऊ-बंदांमध्ये आवडीनुसार दूध/दही यासोबत वाटून खावा. खाऊन झाल्यावर हात धुतलेले पाणी, खरकटे पाणी एका खड्ड्यात (समुद्र) विसर्जित करावे.

विसर्जन

रविवारी संध्याकाळी देवीचे आपल्या घरी आगमन झाल्यावर दुसर्‍या दिवशी सोमवारी देवीचे विसर्जन असते. शक्यतो सकाळी मध्यान्हपूर्वीच देवीचे विसर्जन करतात.

 • घरातील कर्त्या जोडप्याने लवकर शुचिर्भूत होऊन दैनंदिन देवपूजा करावी.
 • वर सांगितल्याप्रमाणे, आदल्या दिवशी देवीजवळ झाकून ठेवलेले रोट आणि कणकेचे दिवे यांचा चुरमा करावा. हा चुरमा घरातील भाऊ-बंदांमध्ये आवडीनुसार दूध/दही यासोबत वाटून खावा. खाऊन झाल्यावर हात धुतलेले पाणी, खरकटे पाणी एका खड्ड्यात (समुद्र) विसर्जित करावे.
 • नैवेद्यासाठी थोडा भात शिजवून त्यावर दही ठेवून नैवेद्य तयार करावा.
 • विसर्जनासाठी देवीचा चौरंग स्थापना केल्या जागेपासून ५-१० पावले पुढे सरकवावा. देवीची आरती करावी, नारळ वाढवावा.
 • त्यानंतर विसर्जनाला निघण्यासाठी देवीचा चौरंग एका सुवासिनीच्या डोक्यावर ठेवावा. सुवासिनीची ओटी भरावी. देवीसमोरून लिंबू कापून ओवाळून टाकावे. विसर्जन मार्गात घागरीने पाणी टाकत विसर्जनासाठी निघावे.
 • देवीचे विसर्जन पूर्वीच्या काळी नदीवर केले जात असे, परंतु कालानुरूप काही व्यावहारिक अडचणींमुळे विसर्जन जवळपासच्या विहिरींवर, घरच्या अंगणात असे होऊ लागले. असो, कालाय तस्मै नम:
 • देवीचा गजर करत, फुगड्या खेळत, नाचत गात वाजत गाजत देवीला विसर्जन स्थळाकडे मार्गक्रमण करावे. देवीचा चौरंग आळी पाळीने एकेका व्यक्तीने आपल्या डोक्यावर घेऊन चालत राहावे. देवीसमोरील रस्त्यात पाणी टाकत राहावे, अधून मधून लिंबू कापून देवीवरून ओवाळून टाकावे.
 • विसर्जन स्थळापूर्वी ‘विसावा’ घेण्याची पद्धत आहे. म्हणजेच एखादा चौक, तिठा अशा ठिकाणी कोणाला त्रास होणार नाही अशा रीतीने बाजूला थांबून देवीचा चौरंग डोक्यावरुन खाली उतरवावा. देवीची आरती करावी, प्रसाद वाटावा. आणि परत विसर्जन स्थळाकडे मार्गक्रमण करावे.
 • विसर्जनस्थळी पोहोचल्यावर चौरंगाला लावलेले केळीचे खांब, इतर पूजापत्री काढून बाजूला ठेवावी, आणि नंतर नदी/तलाव/निर्माल्य विसर्जन कलश, इ ठिकाणी सोडावीत.
 • देवीचे दागिने, साज-शृंगार काढून देवीच्या नारळांना, देवीसमोर ठेवलेल्या देवीच्या टाकांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.
 • देवीच्या कलशातील पाणी पायदळी जाणार नाही अशा रीतीने एखाद्या झाडाजवळ विसर्जित करावे. कलश स्वच्छ धुवून परत नवीन पाण्याने भरून घ्यावा.
 • कलशाखालील तांदूळ, आणि रानबाई खाली ठेवलेले तांदूळ व्यवस्थित गोळा करून सांभाळून बाजूला काढून घ्यावे. या तांदळाची नंतर खीर करून सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यावी.
 • चौरंगही पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.
 • परत पूर्वीप्रमाणे देवीची मांडणी करावी, देवीला साज-शृंगार करावा. देवीची आरती करावी.
 • आरती झाल्यावर देवीला डोक्यावर घेऊन घरी परत यावे. अशा प्रकारे देवीचे विसर्जन होते.
 • घरी परत आल्यावर देवीचे टाक नेहमीप्रमाणे देवघरात स्थानापन्न करावेत. कलशातील पाणी तुळशीस टाकावे. देवीचे नारळ स्वच्छ कोरडे करून, एका वस्त्रात थोड्या तांदुळासोबत गुंडाळून सुरक्षित जागी ठेवावेत. ते खराब होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. देवीचा साज-शृंगार सांभाळून ठेवावा.

अशा प्रकारे अत्यंत आनंदात, उत्साहात श्री कानुमातेचा दोन दिवसाचा उत्सव संपन्न होतो. विसर्जन झाल्यावर खरोखरीची एक पोकळी जाणवते. देवीच्या आगमनाने उल्हसित असलेले वातावरण विसर्जनानंतर अचानक रिक्त वाटू लागते. आणि राहतात मग फक्त आठवणी आणि परत पुढच्या वर्षी देवी लवकर परत यावी ही विनवणी देवी चरणी…

बोला… कानबाईमाता की…जय…. रानबाईमाता की…जय….  

आपण आपली प्रतिक्रिया/अभिप्राय येथे नोंदवू शकता.

error: इतकंच आवडलं असेल तर शेअर करा, कॉपी करणे चांगले नाही.
Scroll to Top
Scroll to Top
%d bloggers like this: