श्री गुरुचरित्र – अध्याय ०१

अध्याय – ०१
मंगलाचरण

॥ श्री गणेशाय नमः॥
॥ श्रीसरस्वत्यै नमः॥
॥ श्रीकुलदेवतायै नमः॥
॥ श्रीपादश्रीवल्लभाय नमः॥
॥ श्रीनृसिंहसरस्वत्यै नमः॥

ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा ।
जय जय लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥१॥
हालविशी कर्णयुगुले । तेथूनि जो का वारा उसळे ।
त्याचेनि वाते विघ्न पळे । विघ्नांतक म्हणती तुज ॥२॥
तुझे शोभे आनन । जैसे तप्त कांचन ।
किंवा उदित प्रभारमण । तैसे तेज फाकतसे ॥३॥
विघ्नकाननच्छेदनासी । हाती फरश धरिलासी ।
नागबंद कटीसी । उरग यज्ञोपवीत ॥४॥
चतुर्भुज दिससी निका । विशालाक्षा विनायका ।
प्रतिपाळिसी विश्वलोका । निर्विघ्ने करूनिया ॥५॥
तुझे चिंतन जे करिती । तया विघ्ने न बाधती ।
सकळाभीष्टे साधती । अविलंबेसी ॥६॥
सकळ मंगल कार्यासी । प्रथम वंदिजे तुम्हासी ।
चतुर्दश विद्यांसी । स्वामी तूचि लंबोदरा ॥७॥
वेद शास्त्रे पुराणे । तुझेचि असेल बोलणे ।
ब्रह्मादिकि या कारणे । स्तविला असे सुरवरी ॥८॥
त्रिपुर साधन करावयासी । ईश्वरे अर्चिले तुम्हासी ।
संहारावया दैत्यांसी । पहिले तुम्हांसी स्तविले ॥९॥
हरिहर ब्रह्मादिक गणपती । कार्यारंभी तुज वंदिती ।
सकळाभीष्टे साधती । तुझेनि प्रसादे ॥१०॥
कृपानिधी गणनाथा । सुरवरादिका विघ्नहर्ता ।
विनायका अभयदाता । मतिप्रकाश करी मज ॥११॥
समस्त गणांचा नायक । तूचि विघ्नांचा अंतक ।
तूते वंदिती जे लोक । कार्य साधे तयांचे ॥१२॥
सकळ कार्या आधारू । तूचि कृपेचा सागरू ।
करुणानिधि गौरीकुमरू । मतिप्रकाश करी मज ॥१३॥
माझे मनींची वासना । तुवा पुरवावी गजानना ।
साष्टांग करितो नमना । विद्या देई मज आता ॥१४॥
नेणता होतो मतिहीन । म्हणोनि धरिले तुझे चरण ।
चौदा विद्यांचे निधान । शरणागतवरप्रदा ॥१५॥
माझिया अंतःकरणीचे व्हावे । गुरुचरित्र कथन करावे ।
पूर्णदृष्टीने पहावे । ग्रंथसिद्धि पाववी दातारा ॥१६॥

हे ॐ कारस्वरूप गणेशा, विघ्नहर्त्या, पार्वतीसुता, गजानना तुला माझा नमस्कार असो. तू लम्बोदर, एकदंत, शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध् आहेस. तुझ्याा हालणाऱ्या कांनापासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या सर्व भक्तांची सर्व संकटे दूर होतात, म्हणून तुला विघ्नांतक, विघ्नहर्ता असे म्हणतात. तप्त सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते. उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते. संकटरुपी अरण्ये तोडून टाकण्यासाठी तू हातात परशू धारण केला आहेस. तू नागबंद म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवीत धारण केले आहेस. हे चतुर्भुज, विशाल नेत्र विनायका, तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सांभाळ करतोस. जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात, त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही. त्यांचे सर्व मनोरथ तत्काळ सिद्धीला जातात. कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते. हे लंबोदर गणेशा, तूच चौदा विद्यांचा, म्हणजे चार वेद, सहा वेदांगे, पुराणे, मीमांसा, न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस. तूच वेद शास्त्रे पुराणे यांचे लेखन केले आहेस, म्हणून तर ब्रह्मदेवादी सर्व देव तुझे स्तवन करतात.
हे गणेशा, अजिंक्य, अवध्य अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकरांने तुझेच स्तवन केले होते. हरी-ब्रह्मादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात. तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात. हे कृपानिधी, गणनायका, हे मूषकवाहना, ॐकारस्वरूप, दु:खहर्त्या, विनायका मला बुद्धी दे. जे लोक तुला वंदन करतात, त्यांची कार्ये सिद्धीला जातात. हे गणेशा, तू कृपासागर आहेस. तू सर्वांचा आधार आहेस. हे गजानना माझे मनोरथ सिद्धीला जावेत, म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार करतो. तू मला ज्ञान दे, बुद्धी दे. हे गणेशा, तू शरण आलेल्यांना वर देणारा आहेस. मी अज्ञानी आहे म्हणून तुला शरण आलो आहे. श्रीगुरुचरित्र लिहावे अशी इच्छा आहे. तुझी माझ्यावर पूर्ण कृपादुष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे.

 

आता वंदू ब्रह्मकुमारी । जिचे नाम वागीश्वरी ।
पुस्तक वीना जिचे करी । हंसवाहिनी असे देखा ॥१७॥
म्हणोनि नमतो तुझे चरणी । प्रसन्न व्हावे मज स्वामिणी ।
राहोनिया माझिये वाणी । ग्रंथी रिघू करी आता ॥१८॥
विद्या वेद शास्त्रांसी । अधिकार जाणा शारदेशी ।
तिये वंदिता विश्वासी । ज्ञान होय अवधारा ॥१९॥
ऐक माझी विनंती । द्यावी आता अवलीला मती ।
विस्तार करावया गुरुचरित्री । मतिप्रकाश करी मज ॥२०॥
जय जय जगन्माते । तूचि विश्वी वाग्देवते ।
वेदशास्त्रे तुझी लिखिते । नांदविशी येणेपरी ॥२१॥
माते तुझिया वाग्बाणी । उत्पत्ति वेदशास्त्रपुराणी ।
वदता साही दर्शनी । त्यांते अशक्य परियेसा ॥२२॥
गुरूचे नामी तुझी स्थित । म्हणती नृसिंहसरस्वती ।
याकारणे मजवरी प्रीति । नाम आपुले म्हणूनी ॥२३॥
खांबसूत्रींची बाहुली जैसी । खेळती तया सूत्रासरसी ।
स्वतंत्रबुधि नाही त्यांसी । वर्तती आणिकाचेनि मते ॥२४॥
तैसे तुझेनि अनुमते । माझे जिव्हे प्रेरीमाते ।
कृपानिधि वाग्देवते । म्हणोनि विनवी तुझा बाळ ॥२५॥
म्हणोनि नमिले तुझे चरण । व्हावे स्वामिणी प्रसन्न ।
द्यावे माते वरदान । ग्रंथी रिघू करवी आता ॥२६॥

आता मी विद्यादेवता सरस्वतीला वंदन करतो. तिच्या हाती वीणा आणि पुस्तक असून ती हंसावर आरूढ झाली आहे. तिला वंदन केले असता ज्ञानप्राप्ती होते. हे सरस्वतीमाते, मी तुला वंदन करतो. वेद शास्त्रेपुराणे तुझ्यााच वाणीने प्रकट झाली आहेत. माते, मला चांगली बुद्धी दे.श्रीनृसिंहसरस्वती हे माझे गुरु आहेत. त्यांच्या नावात तुझे नाव असल्याने तू मला आदरणीय, वंदनीय आहेस. हे जग कळसुत्री बाहुलीप्रमाणे तुझ्याच प्रेरणेने असते, म्हणूनच, हे माते तू मला या ग्रंथलेखानासाठी प्रेरणा दे. मी तुझ्या चरणी आलो आहे, मला वरदान दे. मला विद्यादान दे.

 

आता वंदू त्रिमूर्तीसी । ब्रह्माविष्णुशिवांसी ।
विद्या मागे मी तयासी । अनुक्रमे करोनी ॥२७॥
चतुर्मुखे असती ज्यासी । कर्ता जो का सृष्टीसी ।
वेद झाले बोलते ज्यासी । त्याचे चरणी नमन माझे ॥२८॥

आता मी ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिदेवांना वंदन करतो आणि विद्यादान मागतो. सृष्टी निर्माता, वेद निर्माता म्हणजेच चतुर्मुख अशा देवाला मी नमन करतो.

 

आता वंदू ह्रषीकेशी । जो नायक त्या विश्वासी ।
लक्ष्मीसहित अहर्निशी । क्षीरसागरी असे जाणा ॥२९॥
चतुर्बाहु नरहरी । शंख चक्र गदा करी ।
पद्महस्त मुरारी । पद्मनाभ परियेसा ॥३०॥
पीतांबर असे कसियेला । वैजयंती माळा गळा ।
शरणागता अभीष्ट सकळा । देता होय कृपाळू ॥३१॥

आता मी भगवान विष्णूला वंदन करतो. भगवान विष्णू हा विश्वाचा नायक आहे. तो लक्ष्मीसह क्षीरसागरात वास्तव्य करतो. शंख-चक्र-गदा-पद्मधारी त्या नरहरी विष्णूने गळ्यात वैजयन्तीमाला धारण केली आहे. पितांबरधारी तो विष्णू शरणागतांना इच्छित वस्तू देतो.तो मोठा कृपाळू, दयाळू आहे.

 

आता नमू शिवासी । धरिली गंगा मस्तकेसी ।
पंचवक्त्र दहा भुजेसी । अर्धांगी असे जगन्माता ॥३२॥
पंचवदने असती ज्यासी । संहारी जो या सृष्टीसी ।
म्हणोनि बोलती स्मशानवासी । त्याचे चरणी नमन माझे ॥३३॥
व्याघ्रांबर पांघरून । सर्वांगी असे सर्पवेष्टण ।
ऐसा शंभु उमारमण । त्याचे चरणी नमन माझे ॥३४॥

आता मी पंचमुख, गंगाधर अशा शंकराला वंदन करतो. साक्षात जगन्माता पार्वती त्यांची पत्नी आहे. तोच या जगाचा संहार करतो, म्हणून त्याला स्मशानवासी म्हणतात. व्याघ्रचर्म परिधान केलेल्या सर्वांगावर सर्प धारण केलेल्या त्या शंकराला मी वंदन करतो.

 

नमन समस्त सुरवरा । सिद्धसाध्यां अवधारा ।
गंधर्वयक्षकिन्नरा । ऋषीश्वरा नमन माझे ॥३५॥

सर्व देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध-साध्य, सर्व ऋषीमुनी, इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो.

 

वंदू आता कविकुळासी । पराशरादि व्यासांसी ।
वाल्मीकादि सकळिकांसी । नमन माझे परियेसा ॥३६॥

आता समस्त कवि कुळास वंदन करतो. पराशर, व्यास, वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो.

 

नेणे कवित्व असे कैसे । म्हणोनि तुम्हा विनवितसे ।
ज्ञान द्यावे जी भरवसे । आपुला दास म्हणोनि ॥३७॥
न कळे ग्रंथप्रकार । नेणे शास्त्रांचा विचार ।
भाषा नये महाराष्ट्र । म्हणोनि विनवी तुम्हासी ॥३८॥
समस्त तुम्ही कृपा करणे । माझिया वचना साह्य होणे ।
शब्दब्युत्पत्तीही नेणे । कविकुळ तुम्ही प्रतिपाळा ॥३९॥
ऐसे सकळिका विनवोनि । मग ध्याइले पूर्वज मनी ।
उभयपक्ष जनकजननी । माहात्म्य पुण्यपुरुषांचे ॥४०॥

माझ्या जवळ कवित्व नाही. आपला दास म्हणून माझ्या विनवणीनुसार मला ज्ञान दान करावे. ग्रंथरचना कशी करतात ते माहित नाहीं, मला मराठी भाषा नीट येत नाही, मला शास्त्रज्ञान नाही, म्हणून आपणास विनवणी की आपण सर्वांनी माझ्यावर कृपा करावी. माझ्या या ग्रंथलेखनास सर्वतोपरी सहाय्य करावे. अशाप्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या आई-वडिलांना-पूर्वजांना-महात्म्यांना-पुण्यपुरुषाना नमस्कार करतो.

 

आपस्तंबशाखेसी । गोत्र कौंडिण्य महाऋषि ।
साखरे नाम ख्यातिशी । सायंदेवापासाव ॥४१॥
त्यापासूनि नागनाथ । देवराव तयाचा सुत ।
सदा श्रीसद्‍गुरुचरण ध्यात ॥ गंगाधर जनक माझा ॥४२॥
नमन करिता जनकचरणी । मातापूर्वज ध्यातो मनी ।
जो का पूर्वज नामधारणी । आश्वलायन शाखेचा ॥४३॥
काश्यपाचे गोत्री । चौंडेश्वरी नामधारी ।
वागे जैसा जन्हु अवधारी । अथवा जनक गंगेचा ॥४४॥
त्याची कन्या माझी जननी । निश्चये जैशी भवानी ।
चंपा नामे पुण्यखाणी । स्वामिणी माझी परियेसा ॥४५॥
नमिता जनकजननीसी । नंतर नमू श्रीगुरुसी ।
घाली मति प्रकाशी । गुरुचरण स्मरावया ॥४६॥
गंगाधराचे कुशी । जन्म झाला परियेसी ।
सदा ध्याय श्रीगुरुसी । एका भावे निरंतर ॥४७॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधर । करी संतांसी नमस्कार ।
श्रोतया विनवी वारंवार । क्षमा करणे बाळकासी ॥४८॥
वेदाभ्यासी संन्यासी । यती योगेश्वर तापसी ।
सदा ध्याती श्रीगुरुसी । तयांसी माझा नमस्कार ॥४९॥
विनवितसे समस्तांसी । अल्पमती आपणासी ।
माझे बोबडे बोलांसी । सकळ तुम्ही अंगिकारा ॥५०॥

आपस्तंभ शाखेचे, कौंडीण्य गोत्रात जन्मास आलेले सायंदेव हे आमचे मूळपुरुष. साखरे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ. त्यांचा पुत्र देवव्रत. देवव्रतांचे पुत्र गंगाधर हेच माझे वडील. वडिलांना नमस्कार करून मी मातृकुळाचे स्मरण करतो. अश्वलायन शाखेचे, कश्यप गोत्रात जन्मास आलेल्या चौंडेश्वरी यांची कन्या 'चंपा ' हि माझी आई. आई- वडिलांना नमस्कार करून आता मी सद्गुरूना नमस्कार करतो. माझा पिता गंगाधर, ते सदैव श्रीगुरुंचे ध्यान करीत असत, म्हणून मी माझ्या नावात माझ्या पित्याचे नाव गोवून 'सरस्वती-गंगाधर' असे स्वतःचे नाव धारण केले.
श्रीगुरुंचे सदैव ध्यान करणाऱ्या सर्व साधूसंतांना संन्यासी, यती, तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार, मी या सर्वांना प्रार्थना करतो की, मी अल्पमती आहे. माझे बोबडे बोल गोड मानून घ्या.

 

म्हणे ग्रंथ कथन करी । अमृतघट स्वीकारी ।
तुझे वंशी परंपरी । लाधती चारी पुरुषार्थ ॥५३॥
गुरुवाक्य मज कामधेनु । मनी नाही अनुमानु ।
सिद्धि पावविणार आपणु । श्रीनृसिंहसरस्वती ॥५४॥
त्रैमूर्तीचा अवतार । झाला नृसिंहसरस्वती नर ।
कवण जाणे याचा पार । चरित्र कवणा न वर्णवे ॥५५॥
चरित्र ऐसे श्रीगुरुचे । वर्णू न शके मी वाचे ।
आज्ञापन असे श्रीगुरुचे । म्हणोनि वाचे बोलतसे ॥५६॥

पूर्वीपासून आमच्या कुलावर श्रीगुरूंची कृपा आहे. त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली. ते म्हणाले, "तू आमचे चरित्र कथन कर. त्यामुळे तुझ्या वंशाला धर्मार्थ, काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील". गुरुंची आज्ञा मला प्रमाण आहे. ती आज्ञा म्हणजे प्रसन्न झालेली कामधेनूच. श्रीगुरुंच्या आशीर्वादाने माझा ग्रंथ सिद्धीला जाईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. श्रीनृसिंहसरस्वती हे त्रयमूर्ती श्रीदत्तात्रेयांचा अवतार आहेत. त्यांचे चरित्र अगाध आहे अपार आहे. त्यांचे वर्णन कोण करू शकेल? परंतु प्रत्यक्ष श्री गुरुंनी मला आज्ञा केल्यामुळे मी ते सांगत आहे.

 

ज्यास पुत्रपौत्री असे चाड । त्यासी कथा हे असे गोड ।
लक्ष्मी वसे अखंड । तया भुवनी परियेसा ॥५७॥
ऐशी कथा जयाचे घरी । वाचिती नित्य प्रेमभरी ।
श्रियायुक्त निरंतरी । नांदती पुत्रकलत्रयुक्त ॥५८॥
रोग नाही तया भुवनी । सदा संतुष्ट गुरुकृपेकरोनि ।
निःसंदेह साता दिनी । ऐकता बंधन तुटे जाणा ॥५९॥
ऐसी पुण्यपावन कथा । सांगेन ऐक विस्तारता ।
सायासाविण होय साध्यता । सद्यःफल प्राप्त होय ॥६०॥

ज्याला पुत्रापौत्राची इच्छा असेल, त्याने या चरित्राचे नित्य श्रवण-पठण करावे. जो या चरित्राचे श्रवण-पठण करील त्याच्या घरी लक्ष्मी नित्य वास्तव्य करेल. त्याला सर्वप्रकारची ऐश्वर्ये प्राप्त होतील. श्रीगुरुकृपेने त्याला रोगराईची बाधा होणार नाही. पूर्ण श्रद्धेने या चरित्राचे सात दिवस पारायण केले असता सर्वप्रकारची बंधने नष्ट होतील. अशी ही परमपुण्यदायक कथा मी सांगत आहे.

 

निधान लाधे अप्रयासी । तरी कष्ट का सायासी ।
विश्वास माझिया बोलासी । ऐका श्रोते एकचित्ते ॥६१॥
आम्हा साक्षी ऐसे घडले । म्हणोनि विनवितसे बळे ।
श्रीगुरुस्मरण असे भले । अनुभवा हो सकळिक ॥६२॥
तृप्ति झालियावरी ढेकर । देती जैसे जेवणार ।
गुरुमहिमेचा उद्गार । बोलतसे अनुभवोनि ॥६३॥
मी सामान्य म्हणोनि । उदास व्हाल माझे वचनी ।
मक्षिकेच्या मुखांतुनी । मधु केवी ग्राह्य होय ॥६४॥
जैसे शिंपल्यांत मुक्ताफळ । अथवा कर्पूर कर्दळ ।
विचारी पा अश्वत्थमूळ । कवणापासावउत्पत्ति ॥६५॥
ग्रंथ कराल उदास । वाकुड कृष्ण दिसे ऊस ।
अमृतवत निघे त्याचा रस । दृष्टि द्यावी तयावरी ॥६६॥
तैसे माझे बोलणे । ज्याची चाड गुरुस्मरणे ।
अंगिकार करणार शहाणे । अनुभविती एकचित्ते ॥६७॥
ब्रह्मरसाची गोडी । अनुभवितां फळें रोकडी ।
या बोलाची आवडी । ज्यासी संभवे अनुभव ॥६८॥
गुरुचरित्र कामधेनु । ऐकता होय महाज्ञानु ।
श्रोती करोनिया सावध मनु । एकचिते परियेसा ॥६९॥

श्रोते हो ! मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेवा. आम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. आपणही एकाग्रचित्ताने हे चरित्र श्रवण करून अनुभव घ्या. भोजन केल्यानंतर पोट भरल्याचा तृप्तीचा ढेकर येतो. मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. मधमाशीच्या मुखात असलेल्या अत्यल्प मधसुद्धा ग्राह्य असते. त्याप्रमाणे हे मी स्वानुभवातून बोलत आहे. उस दिसावयास काळा व वाकडा असेल तरी त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो. कावळ्याच्या विष्ठेतून बीजाचा प्रसार होतो व त्यातून पिंपळ उगवतो, हे लक्षात घ्या. श्रीगुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनूच आहे. त्याचे श्रवण केले असता मनुष्याला परमज्ञानाची प्राप्ती होते, म्हणून श्रोते हो ! आपण लक्षपूर्वक ऐका.

 

श्रीगुरुनृसिंहसरस्वती । होते गाणगापुरी ख्याति ।
महिमा त्यांचा अत्यद्‍भुती । सांगेन ऐका एकचित्ते ॥७०॥
तया ग्रामी वसती गुरु । म्हणोनि महिमा असे थोरु ।
जाणती लोक चहू राष्ट्रु । समस्त जाती यात्रेसी ॥७१॥
तेथे राहोनि आराधिती । त्वरित होय फलप्राप्ति ।
पुत्र दारा धन संपत्ति । जे जे इच्छिले होय जना ॥७२॥
लाधोनिया संताने । नामे ठेविती नामकरणे ।
संतोषरूपे येऊन । पावती चारी पुरुषार्थ ॥७३॥

श्रीगुरू नृसिंहसरस्वती गाणगापुरक्षेत्री असतांना त्या क्षेत्राचा महिमा सर्वदूर पसरला. त्या क्षेत्री श्रीगुरुंचे कायमचे वास्तव्य असल्याने असंख्य लोक गाणगापुरक्षेत्री तीर्थयात्रेला सतत जात असतात,तेथे जाऊन श्रीगुरुंची आराधना केली असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. भार्या, पुत्र, धन-संपत्ती, सर्व मनो वांछित कामना पूर्ण होतात. चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते. अनेकांनी हा अनुभव घेतला आहे.

 

ऐसे असता वर्तमानी । भक्त एक ’नामकरणी’ ।
कष्टतसे अति गहनी । सदा ध्याय श्रीगुरुसी ॥७४॥
ऐसा मनी व्याकुळित । चिंतेने वेष्टिला बहुत ।
गुरुदर्शना जाऊ म्हणत । निर्वाणमानसे निघाला ॥७५॥
अति निर्वाण अंतःकरणी । लय होवोनि गुरुचरणी ।
जातो शिष्यशिरोमणी । विसरोनिया क्षुधातृषा ॥७६॥
निर्धार करोनि मानसी । म्हणे पाहीन श्रीगुरुसी ।
अथवा सांडीन देहासी । जडस्वरूपे काय काज ॥७७॥
ज्याचे नामस्मरण करिता । दैन्यहानि होय त्वरिता ।
आपण तैसा नामांकिता । किंकर म्हणतसे ॥७८॥
दैव असे आपुले उणे । तरी का भजावे श्रीगुरुचरण ।
परिस लावता लोहा जाण । सुवर्ण केवी होतसे ॥७९॥
तैसे तुझे नाम परिसे । माझे ह्रदयी सदा वसे ।
माते कष्टी सायासे । ठेविता लाज कवणासी ॥८०॥
या बोलाचिया हेवा । मनी धरोनि पहावा ।
गुरुमूर्ती सदाशिवा । कृपाळू बा सर्वभूती ॥८१॥
अतिव्याकुळ अंतःकरणी । निंदास्तुति आपुली वाणी ।
कष्टला भक्त नामकरणी । करिता होय परियेसा ॥८२॥
राग स्वेच्छा ओवीबद्ध म्हणावे । आजि पाहुणे पंढरीचे रावे ।
वंदू विघ्नहरा भावे । नमू ते सुंदरा शारदेसी ॥८३॥

नामधारक नावाचा एक भक्त सदैव श्री गुरूंचे चिंतन करीत असे. एकदा त्याला श्रीगुरुदर्शनाची तीव्र ओढ लागली, म्हणून तो तहान-भूक विसरून निर्वाणीने गाणगापुराकडे निघाला. 'आता एकतर श्रीगुरुंचे दर्शन तरी घेईन नाहीतर या नश्वर देहाचा त्याग करिन' असा निर्धार करून तो श्रीगुरुंचे स्मरण करीत जात होता. तो मनात श्रीगुरुंना आळवीत होता, "अहो गुरुदेव, लोखंडाला परीसस्पर्श होताच त्याचे सुवर्ण होते असे म्हणतात, आपले नाम परीस आहे. ते माझ्या हृदयात सदैव आहे असे असता, मला इतके दु:ख का बरे भोगावे लागते? परिसस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कोणाचा? हे लक्षात घेऊन माझ्यावर कृपा कर. अहो गुरुदेव, आपण कृपावंत आहात. परमदयाळू आहात.सर्वांच्यावर आपण कृपा करता, मग माझ्या-बद्दल आपणास दया का बरे येत नाही? आपण मला दर्शन दिले नाहीत, तर मी कोठे कुणाकडे जाऊ?" अशाप्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला तो नामधारक पुनः पुन्हा श्रीगुरूंची आळवणी करीत होता.

 

गुरूची त्रैमूर्ति । म्हणती वेदश्रुति ।
सांगती दृष्टान्ती । कलियुगात ॥८४॥
कलियुगात ख्याति । श्रीनृसिहसरस्वती ।
भक्तांसी सारथी । कृपासिंधू ॥८५॥
कृपासिंधु भक्ता । वेद वाखाणिता।
त्रयमूर्ति गुरुनाथा । म्हणोनिया ॥८६॥
त्रयमूर्तीचे गुण । तू एक निधान ।
भक्तांसी रक्षण । दयानिधि ॥८७॥

"अहो गुरुदेव, कलियुगात श्रीगुरू हेच श्रेष्ठ आहेत. ते कृपासिंधू आहेत. भक्तांचे कृपासिंधू, भक्तांचे रक्षणकर्ते आहेत. ते नृसिंहसरस्वती या नावाने विख्यात होतील. ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील." असे वेदवचन आहे. आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा.

 

दयानिधि यती । विनवितो मी श्रीपती ।
नेणे भावभक्ति । अंतःकरणी ॥८८॥
अंतःकरणी स्थिरु । नव्हे बा श्रीगुरु ।
तू कृपासागरु । पाव वेगी ॥८९॥
पाव वेगी आता । नरहरी अनंता ।
बाळालागी माता । केवी टाकी ॥९०॥
तू माता तू पिता । तूचि सखा भ्राता ।
तूचि कुळदेवता । परंपरी ॥९१॥
वंशपरंपरी । धरूनि निर्धारी ।
भजतो मी नरहरी । सरस्वतीसी ॥९२॥
सरस्वती नरहरी । दैन्य माझे हरी ।
म्हणूनि मी निरंतरी । सदा कष्टे व९३॥
सदा कष्ट चित्ता । का हो देशी आता ।
कृपासिंधु भक्ता । केवी होसी ॥९४॥
कृपासिंधु भक्ता । कृपाळू अनंता ।
त्रयमूर्ति जगन्नाथा । दयानिधी ॥९५॥
त्रयमूर्ति तू होसी । पाळिसी विश्वासी ।
समस्त देवांसी । तूचि दाता ॥९६॥
समस्ता देवांसी । तूचि दाता होसी ।
मागो मी कवणासी । तुजवांचोनी ॥९७॥
तुजवाचोनी आता । असे कवण दाता ।
विश्वासी पोषिता । सर्वज्ञ तू ॥९८॥
सर्वज्ञाची खूण । असे हे लक्षण ।
समस्तांचे जाणे । कवण ऐसा ॥९९॥
सर्वज्ञ म्हणोनि । वानिती पुराणी ।
माझे अंतःकरणी । न ये साक्षी ॥१००॥
कवण कैशापरी । असती भूमीवरी ।
जाणिजेचि तरी । सर्वज्ञ तो ॥१॥

हे दयासागरा, मला भावभक्ती माहित नाही. माझे मन स्थिर नाही. तुम्ही कृपासागर आहात. माझ्यावर कृपा करा. आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का? तुम्ही तर माझे माता, पिता, सखा,बंधू आहात. परंपरेने तुम्हीच आमची कुलदेवता आहात. माझ्या वंशात परंपरेने आपली भक्ती चालली आहे, म्हणून मी सुध्दा तुमचेच भजन-पूजन करीत आहे. हे नरहरी, माझे दैन्य, दारिद्र्य दूर करा. तुम्हीच अखिल विश्वाचे पालनपोषण कर्ते आहांत. सर्व देवांचे तुम्हीच दाते आहात. मग तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे काय मागणार? तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराणे सांगतात. मग माझ्या मनातील दु:ख तुम्हाला समजत नाही का?

 

बाळक तान्हये । नेणे बापमाये ।
कृपा केवी होय । मातापित्या ॥२॥
दिलियावांचोनि । न देववे म्हणोनि ।
असेल तुझे मनी । सांग मज ॥३॥
समस्त महीतळी । तुम्हा दिल्हे बळी ।
त्याते हो पाताळी । बैसविले ॥४॥
सुवर्णाची लंका । तुवा दिल्ही एका ।
तेणे पूर्वी लंका । कवणा दिल्ही ॥५॥
अढळ ध्रुवासी । दिल्हे ह्रषीकेशी ।
त्याने हो तुम्हासी । काय दिल्हे ॥६॥
निःक्षत्र करूनी । विप्राते मेदिनी ।
देता तुम्हा कोणी । काय दिल्हे ॥७॥
सृष्टीचा पोषक । तूचि देव एक ।
तूते मी मशक । काय देऊ ॥८॥

बाळाला काय हवे आहे हे त्याच्या आईला लगेच समजते. मग मला काय हवे हे तुम्हाला समजत नसेल का? घ्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा, दैत्यबळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली, त्याला तुम्ही पाताळलोकात पाठविले. तुम्ही श्रीराम अवतारात विभीषणाला लंकेचे राज्य दिले, त्याने तुम्हाला काय दिले? ध्रुवाला तुम्ही अढळपद दिलेत, त्याने तुम्हाला काय दिले? (श्री परशुराम अवतारी ) सर्व पृथ्वी नि:क्षत्रिय करून ब्राह्मणांना दिलीत,त्यांनी तुम्हाला काय दिले? केवळ तुम्हीच या जगाचे पालनपोषण करणारे आहात. मी एक सामान्य मशक तुम्हाला काय देणार?

 

नाही तुम्हा जरी । श्रीमंत नरहरी ।
लक्ष्मी तुझे घरी । नांदतसे ॥९॥
याहोनी आम्हासी । तू काय मागसी ।
सांग ह्रषीकेशी । काय देऊ ॥११०॥
मातेचे वोसंगी । बैसोनिया बाळ वेगी ।
पसरी मुखसुरंगी । स्तनकांक्षेसी ॥११॥
बाळापासी माता । काय मागे ताता ।
ऐक श्रीगुरुनाथा । काय देऊ ॥१२॥
घेऊनिया देता । नाम नाही दाता ।
दयानिधि म्हणता । बोल दिसे ॥१३॥
देऊ न शकसी । म्हणे मी मानसी ।
चौदाही भुवनासी । तूचि दाता ॥१४॥
तुझे मनी पाही । वसे आणिक काही ।
सेवा केली नाही । म्हणोनिया ॥१५॥
सेवा घेवोनिया । देणे हे सामान्य ।
नाम नसे जाण । दातृत्वासी ॥१६॥
तळी बावी विहिरी । असती भूमीवरी ।
मेघ तो अंबरी । वर्षतसे ॥१७॥
मेघाची ही सेवा । न करिता स्वभावा ।
उदकपूर्ण सर्वा । केवी करी ॥१८॥
सेवा अपेक्षिता । बोल असे दाता ।
दयानिधि म्हणता । केवी साजे ॥१९॥
नेणे सेवा कैसी । स्थिर होय मानसी ।
माझे वंशोवंशी । तुझे दास ॥१२०॥
माझे पूर्वजवंशी । सेविले तुम्हांसी ।
संग्रह बहुवसी । तुझे चरणी ॥२१॥
बापाचे सेवेसी । पाळिती पुत्रासी ।
तेवी त्वा आम्हासी । प्रतिपाळावे ॥२२॥
माझे पूर्वधन । तुम्ही द्यावे ऋण ।
का बा नये करुणा । कृपासिंधु ॥२३॥
आमुचे आम्ही घेता । का बा नये चित्ता ।
मागेन मी सत्ता । घेईन आता ॥२४॥
आता मज जरी । न देसी नरहरी ।
जिंतोनि वेव्हारी । घेईन जाणा ॥२५॥
दिसतसे आता । कठिणता गुरुनाथा ।
दास मी अंकिता । सनातन ॥२६॥
आपुले समान । असेल कवण ।
तयासवे मन । कठिण कीजे ॥२७॥

अहो, साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंदिन पाणी भरीत आहे. असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता? आणि मी तरी काय देणार? लहान बाळाला दुध पाजणारी आई त्याच्याकडे काय मागते? काहीच नाही. आधी घेऊन मग देणाऱ्याला 'दाता' असे कसे म्हणता येईल? सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो व मग त्याचा मोबदला देतो. याला दातृत्व म्हणत नाहीत. मेघ जलवृष्टी करून तळी, विहीर पाण्याने भरतो, पण तो त्याबद्दल काहीच मागत नाही कुणाचीही सेवा घेत नाही. आता सेवेबद्दल बोलायचे, तर आमच्या पूर्वजांनी अनेक वर्षे तुमची मनोभावे सेवा केली आहे. म्हणजे आमचे वडीलोपार्जित सेवारूपी धन तुमच्याकडे आहे. त्या बदल्यात तुम्ही माझा सांभाळ करा. तुम्ही असे केले नाही, तर मीही हे सर्व संतांना सांगून तुमच्याकडून इष्ट ते जिंकून घेईन. खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही, मग माझ्याविषयी असे कठोर का वागत? मी तुमचा दासानुदास आहे.

 

कठीण कीजे हरी । तुवा दैत्यांवरी ।
प्रल्हाद कैवारी । सेवकांसी ॥२८॥
सेवका बाळकासी । करू नये ऐसी ।
कठिणता परियेसी । बरवे न दिसे ॥२९॥
माझिया अपराधी । धरोनिया बुद्धि ।
अंतःकरण क्रोधी । पहासी जरी ॥१३०॥
बाळक मातेसी । बोले निष्ठुरेसी ।
अज्ञाने मायेसी । मारी जरी ॥३१॥
माता त्या कुमारासी । कोप न धरी कैशी ।
आलिंगोनि हर्षी । संबोखी पा ॥३२॥
कवण्या अपराधेसी । न घालिसी आम्हासी ।
अहो ह्रषीकेशी । सांगा मज ॥३३॥
माता हो कोपासी । बोले बाळकासी ।
जावोनि पितयासी । सांगे बाळ ॥३४॥
माता कोपे जरी । एखादे अवसरी ।
पिता कृपा करी । संबोखूनि ॥३५॥
तू माता तू पिता । कोपसी गुरुनाथा ।
सांगो कवणा आता । क्षमा करी ॥३६॥
तूचि स्वामी ऐसा । जगी झाला ठसा ।
दास तुझा भलतैसा । प्रतिपाळावा ॥३७॥
अनाथरक्षक । म्हणती तुज लोक ।
मी तुझा बाळक । प्रतिपाळावे ॥३८॥
कृपाळु म्हणोनि । वानिती पुराणी ।
माझे बोल कानी । न घालिसीच ॥३९॥
नायकसी गुरुराणा । माझे करुनावचना ।
काय दुश्चितपणा । तुझा असे ॥४०॥
माझे करुणावचन । न ऐकती तुझे कान ।
ऐकोनि पाषाण । विखुरतसे ॥४१॥
करुणा करी ऐसे । वानिती तुज पिसे ।
अजुनी तरी कैसे । कृपा न ये ॥४२॥

प्रल्हादासारख्या दैत्याचे तुम्ही कैवारी झालात, मग तुम्हाला माझी दया का येत नाही? मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही? आई आपल्या बालकास रागे भरली, मारली तरी बालकास जवळ घेऊन समजावतेच ना? मग मला कोणत्या अपराधासाठी जवळ घेत नाही? आई रागावली तर बालक पित्याकडे जातो, आणि पिता रागावला तर तो आईच्या कुशीत शिरतो. अहो गुरुदेव,तुम्हीच माझे आई-वडील आहात, मग मी कोणाकडे जाऊ? तुम्ही अनाथरक्षक आहात म्हणून तुम्हीच माझे रक्षण करा. माझ्या बोलण्याने पाषाणालाही पाझर फुटेल, मग माझ्याविषयी तुम्हाला करुणा का येत नाही?

 

ऐसे नामांकित । विनविता त्वरित ।
कृपाळु श्रीगुरुनाथ । आले वेगी ॥४३॥
वत्सालागी धेनु । जैशी ये धावोनु ।
तैसे श्रीगुरु आपणु । आले जवळी ॥४४॥
येतांचि गुरुमुनि । वंदी नामकरणी ।
मस्तक ठेवोनि । चरणयुग्मी ॥४५॥
केश तो मोकळी । झाडी चरणधुळी ।
आनंदाश्रुजळी । अंघ्रि क्षाळी ॥४६॥
ह्रदयमंदिरात । बैसवोनि व्यक्त ।
पूजा उपचारित । षोडशविधि ॥४७॥
आनंदभरित । झाला नामांकित ।
ह्रदयी श्रीगुरुनाथ । स्थिरावला ॥४८॥
भक्तांच्या ह्रदयांत । राहे श्रीगुरुनाथ।
संतोष बहुत । सरस्वतीसी ॥४९॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने
सिद्धनामधारकसंवादे मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्यायः ॥१॥
॥ ओवीसंख्या १४९॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

त्या नामधारक शिष्याने अशी परोपरीने विनवणी केली असता कृपाळू गुरुनाथ त्याच्याकडे धावत आले. गाय जशी वासराला मायेने जवळ घेते त्याप्रमाणे श्रीगुरु जवळ आले. श्रीगुरु येताच त्या नामधारकाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. त्याचे मन शांत झाले. त्याने आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणांवरील धूळ झाडली. डोळ्यातील आनंदाश्रुंनी त्यांच्या चरणांना स्नान घतले. त्यांची आपल्या हृदयमंदीरात स्थापना करून यथाविधी षोडशोपचारे पूजा केली. त्याच्या हृदयात श्रीगुरू स्थिर झाले. अशाप्रकारे श्रीगुरू आपल्या भक्तांच्या हृदयात वास्तव्य करतात, त्यामुळे सरस्वती गंगाधरला अतीव संतोष होतो.
अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'मंगलाचरण' नावाचा अध्याय पहिला समाप्त.
॥ओवी संख्या १४९॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

आपण आपली प्रतिक्रिया/अभिप्राय येथे नोंदवू शकता.

error: इतकंच आवडलं असेल तर शेअर करा, कॉपी करणे चांगले नाही.
Scroll to Top
Scroll to Top
%d bloggers like this: