मामासाहेब दांडेकर – एका दैवी अनुभूतीची गाथा

मामासाहेब दांडेकर

मामासाहेब दांडेकर

मामासाहेब दांडेकर – एका दैवी अनुभूतीची गाथा

वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक अशी मुख्य ओळख असलेले श्री ज्ञानेश्वरीचे संशोधनात्मक संपादन करून सार्थ श्री ज्ञानेश्वरी आपल्या पिढ्यांपर्यंत पोचविणारे आणि संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक शंकर वामन उर्फ सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकर यांची आज ५४ वी पुण्यतिथी आहे. मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील दांडे-आढुंब गावचे रहिवासी असलेल्या आणि कालांतराने ठाणे जिल्ह्यातील केळवे माहीम येथे स्थलांतरित झालेल्या मूळच्या पोंक्षे घराण्यातील या मंडळींना दांडे गावावरून दांडेकर ही ओळख मिळाली. सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशा या कुटुंबात २०/४/१८९६ रोजी एका पुण्यात्म्याचा जन्म झाला - तेच मामासाहेब दांडेकर. अवघ्या दीड वर्षांचे असतानाच मातृछत्र हरपलेल्या या बाळाचे संगोपन पुढे त्यांच्या काशीबाई कर्वे उर्फ जिजी या मोठ्या विधवा बहिणीने आणि वडील वामनराव यांनी केले. काशीबाईंची दोन लहान मुले प्रेमाने त्यांना सोनू मामा म्हणत असत. पुढे यावरूनच सोनोपंत व मामासाहेब अशी नामाभिधाने त्यांना मिळालीत आणि मूळचे शंकर वामन नंतर सोनोपंत उर्फ मामासाहेब म्हणून परिचित झाले.

सोनोपंत पुण्यात जिजींकडे असतांनाच वयाच्या अवघ्या १२व्या वर्षीच त्यांना जोग महाराजांचा अनुग्रह मिळाला. १९०८ मध्ये मिळालेल्या या अनुग्रहानंतर मामांची हरिभक्ती - देशभक्ती आणि ज्ञानेश्वरी ची गोडी वाढीस लागली पुढे ते पुण्याच्या स. प. महाविद्यालयात प्राध्यापक असताना गुरुदेव रानडे यांच्या सहवासात त्यांच्यातला तत्त्वज्ञ बहरला. त्यांनी पौर्वात्य आणि पाश्र्चात्य तत्त्वज्ञानाचा प्रगाढ अभ्यास करून " ज्ञानदेव आणि प्लेटो " हा दोन्ही तत्त्वज्ञानांवरील व्यासंग पूर्ण व तुलनात्मक ग्रंथ लिहिला. त्याप्रसंगी डॉक्टर राधाकृष्णन मेनन यांनी ' अ ग्रेट फिलॉसॉफर ऑफ टुडे ' अशा शब्दात त्यांचा गौरव करून त्यांची थोरवी समाजाच्या लक्षात आणून दिली. त्यांनी पुण्याचे स.प. महाविद्यालय मुंबईचे राम नारायण रुईया महाविद्यालय येथे प्राध्यापक आणि प्राचार्य पद भूषवले प्राचार्य पदी असतांनाच त्यांनी प्रसाद मासिकाचे यशस्वी संपादन केले. त्याच सुमारास अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेच्या अध्यक्ष पदाचा मानही त्यांना मिळाला. त्यांनी ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर १९५३ मध्ये श्रीक्षेत्र नेवासे येथील श्री ज्ञानेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या पिंपळनेर येथील श्रीसंत निळोबाराय मंदिराचा जिर्णोद्धार केला १९५६ साली महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या सार्थ ज्ञानेश्वरीच्या संशोधन समितीचे ते अध्यक्ष होते त्यांची सार्थ श्रीज्ञानेश्वरी आणि इतिहासाचार्य राजवाडे संशोधित ज्ञानेश्वरी या दोनही ज्ञानेश्वरींच्या मामांनी लिहिलेल्या प्रस्तावना कमालीच्या व्यासंगपूर्ण असून एखाद्या स्वतंत्र ग्रंथांइतकेच त्यांचे महत्त्व आहे.

ज्ञानेश्वरी, नामदेव गाथा, भावार्थ रामायण हे ग्रंथही त्यांनी संशोधनपूर्वक शुद्ध स्वरूपात आपल्यापुढे ठेवले. त्यांनी ज्ञानदेव आणि प्लेटो, ईश्वरवाद, अध्यात्मवादाची मूलतत्त्वे, अभंग संकीर्तन भाग एक- दोन- तीन, ज्ञानदेव चरित्र, वारकरी पंथाचा इतिहास, गीताश्र्लोकांवरील प्रवचने, जोग महाराजांचे चरित्र इत्यादी २८हून अधिक मौलिक ग्रंथांचे लेखन केले आहे. या व्यतिरिक्त अनेक विख्यात ग्रंथांचे संपादन, प्रस्तावना लेखन आणि प्रसाद मासिकात अनेकानेक लेख लिहिले आहेत.

त्यांची महत्त्वपूर्ण शिकवण अशी -
१) धार्मिक ग्रंथांची पारायणे करण्यापेक्षा त्यातील विचार आचरणात आणावेत.
२) धर्माला अध्यात्माची जोड द्यावी.
३) तत्त्वज्ञान, अध्यात्म हे फक्त ग्रंथ विषय न ठेवता ते जीवनात आचरणात आणावेत.

मामासाहेब दांडेकर
मामासाहेब दांडेकर

आजच्याच तिथीला आषाढ शुद्ध चतुर्दशीला ता.९/७/१९६८ला संपूर्ण महाराष्ट्र एका महान कर्मयोग्याला, भागवत भक्ताला, तत्त्वचिंतकाला, आदर्श गुरूला मुकला. केवळ प्रकृतीची साथ नसल्याने १९६८ सालची मामांची पंढरपूरची पायी वारी चुकली आणि त्या गोष्टीची खंत या कोमल हृदयात क्षत करून गेली. त्यांच्या अंतीम इच्छेनुसार त्या पवित्र देहाचे विसर्जन श्रीक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी काठी करण्यात आले. पुणे ते आळंदी या संपूर्ण मार्गावर पसरलेला तो अथांग शोकाकूल आणि भावव्याकूळ जनसमुदाय पाहाण्याचे भाग्य लाभलेल्यांसाठी ती एक दैवी अनुभूतीच होती.

- लेखन, संकलन, संपादन - सोमनाथशास्त्री विभांडिक, ठाणे.
संपर्क - ९४२३९ ६४६७३
आषाढ शुद्ध चतुर्दशी, ता.१२/७/२०२२.

1 thought on “मामासाहेब दांडेकर – एका दैवी अनुभूतीची गाथा”

आपण आपली प्रतिक्रिया/अभिप्राय येथे नोंदवू शकता.

error: इतकंच आवडलं असेल तर शेअर करा, कॉपी करणे चांगले नाही.
Scroll to Top
Scroll to Top
%d bloggers like this: