ज्ञान पंचमी

ज्ञान पंचमी

सरस्वती देवी
सरस्वती देवी

कार्तिक शुक्लपक्षातल्या पंचमीला ज्ञान पंचमी किंवा पांडव पंचमी किंवा सौभाग्य पंचमी अशी विविध नावे आहेत. हा वर्षातून एकदा येणारा माता सरस्वतीच्या आराधना-पूजनाचा अतिशय पवित्र असा मुहूर्त असतो. सरस्वती ही आध्यात्मिकता, विद्या, ज्ञान, मातृत्व, ग्रंथशक्ती, मंत्रशक्ती, तंत्रशक्ती यांची देवता मानली जाते. या ठिकाणी मंत्र या अर्थी दक्षिण पंथी / वैदिक पंथी आणि तंत्र या अर्थी वामपंथी साधना अभिप्रेत आहेत. याशिवाय संगीत, कला, वाणी, पराविद्या यांचीसुद्धा ही देवता आहे.

सरस्वतीची नांवे :
तसे पाहू गेले तर सरस्वतीच्या सुद्धा एक हजार नावांची सहस्त्रनामावली प्रचलित आहे. या हजार नावांपैकी काही सर्वपरिचित अशी नावे खालील प्रमाणे आहेत.
१) शारदा
२) हंसवाहिनी
३) वाग्देवता
४) कमलासनी
५) सावित्री
६) भगवती
७) ब्रह्मचारिणी
८) वरदायिनी
९) भुवनेश्वरी
१०) बुद्धिदात्री
११) सिद्धिदात्री
१२) महासरस्वती
१४) श्र्वेतांबरी
१५) हरिवल्लभा

चतुर्भुजा असलेल्या या देवीची चार आयुधे म्हणजे वीणा, जपमाला, वेद आणि ब्रह्मास्त्र ही आहेत. ही शुभ्रवर्णा, श्वेतवस्त्रा, वीणा-पुस्तक धारिणी, हंसवाहिनी अशा रुपात अधिक परिचित आहे. मात्र जैन पुराणांमधून आणि विविध लोक कथांमधून सरस्वतीचे वाहन मोर असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे पाठभेदाने अथवा पंथभेदाने सरस्वतीचे वाहन हंसाप्रमाणेच मोर असल्याचेही चित्रांमध्ये पाहावयास मिळते. माघ महिन्यातल्या शुद्ध पंचमीला वसंतपंचमी किंवा श्रीपंचमी असं म्हणतात. (वसंत पंचमी सविस्तर माहिती - येथे पहा). या दिवशी माता सरस्वतीचा जन्म झाल्याचे मानतात. म्हणून वसंतपंचमी ही "सरस्वती जयंती" म्हणून साजरी करण्याचा प्रघात सर्वत्र आढळून येतो. या दिवशी केलेले सरस्वती पूजन हे उपासकाला अत्यंत मेधावी आणि बुद्धिमान करते. तसेच त्याच्या सर्व इच्छित मनोकामना ही पूर्ण करते, अशी सर्वत्र समजूत आहे.

सरस्वतीचे वर्णन / उल्लेख वेदांमध्येही मेधा सुक्तामध्ये असून, ब्रह्मवैवर्त पुराण, कालिका पुराण, श्रीमत् देवी भागवत, शिव महापुराण वगैरे अनेक ग्रंथांमधून आढळून येतो. ही परम चेतना आहे. सरस्वतीच्या रूपामध्ये ही आपल्या बुद्धी, प्रज्ञा आणि मनोवृत्तींची संरक्षक आहे. आपल्या ठिकाणी असलेल्या आचार आणि मेधा यांचा मूळ आधार सरस्वती देवीच आहे. ही परम समृद्ध आणि वैभवसंपन्न अशी देवता आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी हिला दिलेल्या वरदानानुसार वसंत पंचमीच्या दिवशी हिची पूजा-आराधना करणाऱ्या भक्तांचे सर्व मनोवांछित संकल्प पूर्ण होतात. त्यांची ज्ञान, विद्या आणि कला यामध्ये खूप प्रगती होते. सरस्वती मातेच्या महान उपासकांपैकी आद्य शंकराचार्य, वोपदेव, कवी कुलगुरू कालिदास, रामानंदाचार्य, माधवाचार्य हे तर होतेच. शिवाय महर्षी वेदव्यास, महर्षी वाल्मिकी यांच्यासारखे थोर आद्यकवीसुद्धा होते.

उपासनेपासून होणारे लाभ :
१) बौद्धिक क्षमता विकसित होणे.
२) मनाची चंचलता दूर होऊन एकाग्रता साध्य होणे.
३) मस्तिष्काशी संबंधित अनिद्रा, मानसिक तणाव, डोकेदुखी दूर होणे.
४) कल्पनाशक्तीचा योग्य विकास घडून निर्णय क्षमता प्रभावी होणे.
५) विस्मृती, प्रमाद, दीर्घसूत्रीपणा, मानसिक दुर्बलता दूर होते.
या व्यतिरिक्त ही इतर अनेक लाभ या उपासनेने मिळतात.

सरस्वतीचे सिद्धिदायक मंत्र-स्तोत्र ∼
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥ १॥

शुक्लां ब्रह्मविचार सार परमामाद्यां जगद्व्यापिनीं
वीणा-पुस्तक-धारिणीमभयदां जाड्यान्धकारापहाम्‌ ।
हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिताम्‌
वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्‌॥ २॥

सरस्वती नमस्तुभ्यं वन्दे कामरुपिणि ।
विद्यारम्भम् करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा ॥ ३ ॥

हे आणि याव्यतिरिक्त अनेक वेदोक्त, पुराणोक्त, तंत्रोक्त वगैरे अनेक मंत्र-स्तोत्रे असून त्यापैकी काहींची जपपद्धती तर काहींची उपासनेनुसार आचरणपद्धती वेगवेगळ्या आहेत. सर्व सामान्य उपासकांनी तंत्राच्या अधिक खोलात न जाता सामान्य व सोप्या उपासना करणेच अधिक योग्य आहे.

आपणां सर्वांचा हितचिंतक,
सोमनाथशास्त्री विभांडिक, ठाणे
वास्तु-ज्योतिष शास्त्री
संपर्क – ९४२३९ ६४६७३
शुक्रवार,ता.१७/११/२०२३
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

1 thought on “ज्ञान पंचमी”

  1. Ratnakar Shantaram Vadnere

    अतिशय उपयुक्त व संक्षिप्त माहिती दिली. त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.

आपण आपली प्रतिक्रिया/अभिप्राय येथे नोंदवू शकता.

error: इतकंच आवडलं असेल तर शेअर करा, कॉपी करणे चांगले नाही.
Scroll to Top
Scroll to Top
%d bloggers like this:
Enable Notifications OK No Thanks