पं. गोपीनाथ कविराज : महान दार्शनिक, विचारवंत, साधक (लेखांक – ३)
पंडित गोपीनाथ कविराज हे संपूर्ण विश्वातील या शतकातील उल्लेखनीय युगपुरुष आहेत. पंडितजींच्या अध्यात्मिक साधनेविषयी फारच थोड्या विद्वान व जिज्ञासू लोकांना माहिती आहे. विसाव्या शतकातील विराट व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख सांगता येईल.
अशा या तैलबुद्धी अभ्यासकाची भविष्यात एका महान योग्याच्या रूपात साधनारत होऊन मानव कल्याणासाठी सर्वमुक्तिच्या दिशेने कार्य करण्यासाठी बहुतेक नियतीने निवड केली असावी. ता.२१ जानेवारी १९१८ रोजी योगिराज विशुद्धानंद परमहंस यांनी दीक्षा देऊन त्यांना अनुग्रहित केले. पौर्वात्य मंत्र-यंत्र-तंत्र शास्त्रातील महान पंडीत, महान साधक विशुद्धानंद परमहंस यांचे शिष्यत्व लाभणे ही परमभाग्याची गोष्ट आहे. विद्येच्या क्षेत्रात लिलया वावरणाऱ्या पंडीतजींना या दीक्षेनंतर पुढे भक्ती, दर्शन आणि आगम शास्त्रांमध्ये रस निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी भारतीय आस्तिकवाद, गोरक्षनाथ पंथ, वीरशैव मत, तांत्रिक दर्शन, मध्ययुगीन भक्ती संप्रदाय, गौडीय वैष्णव धर्म या विषयांवर सखोल अभ्यास-चिंतन केले. हेच पंडितजींच्या जीवन प्रवाहातील एक महत्त्वाचे वळण होते.