भगवान श्रीराम : आदर्श संस्कार आणि सदाचार
जीवन सुसंस्कृत, मर्यादा पूर्ण करण्यासाठी शास्त्रांमध्ये विविध संस्कारांचे महत्त्व दिले आहे. भारतीय संस्कृतीतील शास्त्रोक्त संस्कार हे आध्यात्मिक जीवनाचे मजबूत आधार स्तंभ आहेत. साक्षात ब्रह्म्याचे मानसपुत्र असलेले आणि मूर्तिमंत धर्माचरण, ज्ञान, वैराग्य, सहिष्णुता व सदाचाराचे प्रतीक असलेले ब्रह्मर्षि वसिष्ठ हेच ज्यांचे परमगुरू आणि कुलगुरू होते त्या प्रभू श्रीरामांचे जीवनही तसेच संस्कारसंपन्न आणि सदाचारयुक्त होते. संस्कारयुक्त जीवनाने स्वार्थ आणि परमार्थ दोन्हींमध्ये समतोल साधला जातो.
मानवी जीवनाच्या हितासाठीच केवळ जगणाऱ्या आदिकवी महर्षि वाल्मिकींनी त्रेतायुगातील तत्कालीन परिस्थितीमुळे व्यथित अंत:करणाने देवर्षि नारदांना विचारले की, “ हे प्रभो, गुणवान, वीर्यवान, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवादी आणि दृढव्रती व सदाचारी असा कोण पुरुष या त्रेतायुगात सर्व जीवांचा हितकारक असेल ? ” त्यावर महर्षि नारदांनी सांगितले की, इक्ष्वाकु कुळात जन्माला आलेला, मनाला जिंकलेला, महाबलवान, कान्तिमान, धैर्यवान, बुद्धिमान, नीतिज्ञ व शत्रुसंहारक आणि जितेंद्रिय असा भगवान श्रीराम हाच तो पुरुष आहे.
नारदमुनी पुढे म्हणतात की, पुष्ट, सुडौल, धर्मज्ञ, वेदवेदाङ्गतत्त्वज्ञ आणि सर्वलोकप्रिय असा हा श्रीराम आहे. समुद्राला जसे सर्व नद्या येऊन मिळतात तसेच सर्व सद्गुण आणि साधुवृत्ती अशा या श्रीरामांना येऊन मिळतात. अशा शब्दांत वाल्मिकी महर्षिंच्या व्यथेचे निरसन देवर्षि नारदांनी केले.
गंभीरतेत समुद्राच्या आणि धैर्यामध्ये हिमालयाच्या उत्तुंगतेचे श्रीरामांचे चरित्र आहे. श्रीराम व्यक्ति नाही तर समष्टिच आहे.
न हि तद् भविता राष्ट्रं यत्र रामो न भूपति:।
तद् नवं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति ॥
(वाल्मिकी रामायण २/३७/२९)
म्हणजे जेथे राम नाही ते राज्य राज्यच नाही आणि श्रीरामांचा निवास असेल त्या वनालाही स्वतंत्र राष्ट्राचा महिमा प्राप्त होईल.
अशा या संस्कारभूषित श्रीरामांची गाथा सम्पूर्ण विश्र्व-मानवतेची गाथा आहे. या उदात्त व महन्मङ्गल चरित्राचा स्विकारच सम्पूर्ण राष्ट्र आणि विश्र्वामध्ये शांती, सुरक्षा आणि सौहार्दाचे निर्माण करू शकतो.
अयोध्या नगरीतील राजमहालात मंथरा नांवाच्या दासीने आपल्या कुटील कारस्थान आणि विषाक्त विचारांचे बीज पेरले. कैकेयीच्या ईर्ष्याग्नीच्या ज्वालांनी संपूर्ण राजमहालातील सुखसंवाद आणि सौहार्दाचे वातावरण करपून गेले. महाराज दशरथ निश्चेष्ट होऊन पडले. केवळ पित्याने दिलेल्या वचनांची पूर्तता करणे हेच सुपुत्राचे प्रथम कर्तव्य असते आणि ते पार पाडण्यातच पुत्राच्या जीवनाची इति-कर्तव्यता किंवा सार्थक असते असे अत्यंत विनम्र शब्दात दशरथ राजांना सांगून त्यांचे सांत्वन प्रभू श्रीरामांनी केले. अथर्ववेदांमध्ये यासंबंधी असे म्हटले आहे की,
अनुव्रत: पितु: पुत्रो मात्रा भवतु संमना: ।
म्हणजे पुत्र हा आपल्या पित्याच्या व्रताचे व मातेच्या आज्ञेचे पालन करणारा असावा. ही उक्ती श्रीरामांनी आपल्या आचरणातून सार्थ ठरवली. महाभारत या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे ज्याची मन:शुद्धी, क्रिया-शुद्धी, कुल-शुद्धी, शरीर-शुद्धी, आणि वाक्-शुद्धी अशा पाच प्रकारच्या शुद्धी झालेल्या असतात, तोच मनुष्य हृदयाने देखील अत्यंत शुद्ध झालेला असतो. हाच प्रत्यय वरील प्रसंगात दिसून येतो.
त्या अती संवेदनशील प्रसंगातही श्रीरामांची संस्कारपूर्ण मर्यादा सखोल जलाशयातल्या कमलपत्राप्रमाणे अबाधित राहीली. राज्यप्राप्तीच्या कल्पनेने हर्षित नाही आणि वनवास भोगाच्या दु:खाने म्लान नाही, असा चित्ताचा समतोल केवळ श्रीरामच साधू शकतात. वनवास भोगालाही आपले सौभाग्य मानून पित्याचे सांत्वन करण्याचे मनोधैर्य दाखवतात. याप्रसंगाचे वर्णन करताना गोस्वामी तुलसीदास श्रीरामचरितमानस मध्ये म्हणतात,
धरम धुरीन धरम गति जानी ।
कहेउ मातु सन अति मृदु बानी ॥
पिताँ दीन्ह मोहि कानन राजू ।
जहँ सब भाँतिमोर बड़़ काजू ॥
श्रीरामांचे हे धीरोदात्त उद्गार लक्षात आणून देतात की, सुख-साम्राज्याचा भोग घेण्यापेक्षा त्यागमय जीवन जगण्यासाठीच त्यांच्या सुसंस्कारित मनाची ओढ अधिक होती. केवळ या एका कृतीतून श्रीराम सामान्य स्तरावरून उत्तुंग पातळीवर विराजमान झालेत.
त्यांच्या उज्ज्वल चारित्र्यावर दृष्टीक्षेप टाकला तर किती प्रसंगांतून त्यांची संस्कारसम्पन्नता दिसून येते. एका नावाड्याला गळाभेट देणे, शबरीची उष्टी बोरे खाणे, जटायुच्या रूपातील गिधाड पक्षाची विकल अवस्था पाहून स्वतः रडणे आणि पित्यासमान त्याचे अन्तिम संस्कार करणे, वनवासी - तपस्वी - ॠषि - महर्षि - पशु - पक्षी - वानर इत्यादि अनेक जीव श्रीरामांच्या संस्कार गंगेत न्हाऊन धन्य झालेत.
श्रीराम मानव समाजातील संस्कारांचे मूर्त रूप आहेत. लोकजीवनाशी एकरूप होऊनसुद्धा त्यांचा जीवनस्तर फारच उच्च कोटीचा आहे. या अलौकिक संस्कार सामर्थ्यामुळेच अमर्याद सागरही त्यांच्यापुढे मर्यादित झाला, दगड तरंगायला लागले, किष्किधेचा अवघा वानर समुदाय राममय झाला आणि खर - दूषणांनी त्यांच्या अनुपम सौंदर्यावर आश्र्चर्येचकित होऊन उद्गार काढले, -
हम भरि जन्म सुनहुसब भाई ।
देखी नहिं असि सुंदरताई ॥
(रामचरितमानस ३/१९/४)
आपल्या सर्व भावांप्रति आदर्श बंधूप्रेम, सुग्रीवासोबतची आदर्श मैत्री, बिभीषणाला दिलेले परम आश्रयस्थान, आश्रित वानरांशी केलेला सद् व्यवहार, प्रजेसाठीचा प्रजावत्सल भाव, पूज्य ॠषि-मुनिंबद्दलचा विनम्र भाव हे सर्वच श्रीरामांच्या संस्कारांचे परम पवित्र द्योतक आहेत.
प्रत्यक्ष युद्धभूमीवर, युद्ध श्रमांनी तूं श्रांत-क्लांत झाला आहेस म्हणून मी तुझ्यावर बाण टाकून तुला यमसदनी धाडले नाही. लंकेत जाऊन विश्रांतीने पूर्ण होऊन ये, मग मी तुझा समाचार घेईन ! असे विशाल हृदयी, शौर्यपूर्ण उदारतेचे उद्गार फक्त श्रीरामच काढू शकतात. (वाल्मिकी रामायण : ६/५९/१४३-१४३)
या अशा उदार हृदयी धीरोदात्त व्यवहाराबद्दल विष्णू पुराणात असे म्हटले आहे की,
सदाचाररत: प्राज्ञो विद्याविनयशिक्षित: ।
पापेऽप्यपाप: परुषे ह्यभिधत्ते प्रियाणि य: ।
मैत्री द्रवान्त:करणस्तस्य मुक्ति: करे स्थिता ॥
म्हणजे बुद्धिमान गृहस्थ सदाचाराच्या पालनानेच संसार बंधनातून मुक्त होतो. विद्या आणि विनयाने परिपूर्ण व्यक्ति त्यांच्या सहवासात येणाऱ्या दुष्ट व पापी लोकांबद्दलही कठोर आणि पापमय व्यवहार करीत नसतात, ते सर्वांशी हितकारक, प्रिय आणि मैत्रीपूर्ण व्यवहारच करतात.
युद्धभूमीवर धारातीर्थी पडलेल्या रावणाच्या अन्त्यसंस्काराला नकार देणाऱ्या बिभीषणाला श्रीरामांनी समजावून सांगितले की, मरणानंतर वैराचा नाश होतो, या नीतिला धरून आता मरणोत्तर रावण जसा तुझा भाऊ आहे तसाच तो इतरांचाही भाऊ आहे, आणि तू त्याचे अंतिम दाह-संस्कार कर.
मरणान्तानि वैराणि निवृत्तं न: प्रयोजनम्।
क्रियतामस्य संस्कारो ममाप्येय यंदा तव ॥
(वाल्मिकी रामायण: ६/१११/१००-१०१)
अशा परम उदार उपदेशपर शब्दांत त्यांनी बिभीषणाला रावणावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रेरीत केले. केवढे हे शत्रूबद्दलही औदार्य ! हीच तर आहे श्रीरामांची संस्कारपूर्ण करूणा आणि क्षमाशील वृत्ती !
भक्त वत्सलता आणि शरणागतांच्या उद्धारासाठी अखंड तत्परता हे श्रीरामांचे अनुपम ऐश्र्वर्ये आहे. म्हणूनच आदिकवि वाल्मिकी म्हणतात की,-
एक तर आम्ही श्रीरामांचे दर्शन घेऊ शकावे किंवा श्रीरामांची दृष्टी आमच्यावर पडावी, यातच मनुष्य जीवनाची खरीखुरी सार्थकता आहे.
यश्र्च रामं न पश्येत्तु यं च रामो न पश्यति ।
निन्दित: सर्वलोकेषु स्वात्माप्येनं विगर्हते ॥
॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥
साभार : कल्याण, गीताप्रेस
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩
सोमनाथशास्त्री विभांडिक, ठाणे
संपर्क – ९४२३९ ६४६७३
चैत्र शु. नवमी, ता. ३०/०३/२०२३
श्रीरामरक्षा स्तोत्राचा मराठी भावानुवाद समजून घेण्यासाठी - येथे क्लिक करा.